Sun, Apr 21, 2019 01:50होमपेज › Solapur › पालिका प्रशासन निष्क्रिय; दररोज पाणी दिवास्वप्नच!

पालिका प्रशासन निष्क्रिय; दररोज पाणी दिवास्वप्नच!

Published On: Sep 03 2018 1:42AM | Last Updated: Sep 02 2018 9:42PMसोलापूर : दीपक होमकर 

सोलापूर शहराला पाणीपुरवठा करणारे उजनी धरण गेली काही वर्षे सलग शंभर टक्के भरत असतानाही सोलापूरकरांना तीन ते चार दिवसांआड आणि विस्कळीत पाणीपुरवठा होणे म्हणजे ही पालिका प्रशासनाची निष्क्रियताच असल्याचे स्पष्ट होते. वर्षानुवर्षे काँगे्रसला नावे ठेवणारे भाजप सत्तेत येऊन, दीड वर्ष झाले तरी अद्याप पाणीपुरवठ्याची स्थिती जैसे थे असल्याने प्रशासन व नगरसेवकांसह पालकमंत्री, महापौर, आयुक्त हे देखील पाणीपुरवठ्यापुढे हतबल झाल्याचे स्पष्ट होत आहे.

उजनी धरण शंभर टक्के भरल्याने सध्या सोलापुरातील सत्ताधार्‍यांनी आनंदोत्सव सुरु केला आहे. मात्र गेल्यावर्षीसुध्दा उजनी धरण शंभर टक्के भरले तरी ऐन पावसाळ्यात तीन दिवसाआड, तर उन्हाळ्यात तब्बल पाच दिवसाआड नळाला पाणी सोडण्यात येत होते. त्यामुळे किमान यंदा तरी ही वितरण व्यवस्था सुधारणार का आणि  वर्षभर पाणीपट्टी भरणार्‍यांना त्यांच्या हक्काचे रोजचे पाणी मिळणार का, असा प्रश्‍न आहे.

सोलापुराची लोकसंख्या साधारणतः दहा लाख गृहित धरण्यात येते. त्यासाठी दररोज सोलापुराला सुमारे 190 दशलक्ष लिटर पाण्याची आवश्यकता आहे. मात्र सध्या केवळ 90 दशलक्ष लिटर इतकेच पाणी सोलापूरला पोहचते. त्यामुळे रोज 100 दशलक्ष लिटर पाण्याचा तुटवडा निर्माण होऊन तीन ते सहा दिवसाआड पाणीपुरवठ्याचे नियोजन महापालिका करते. सध्या उजनी ते सोलापूर 110 एमएलडी पाणीपुरवठा करणारी समांतर जलवाहिनीसाठी दररोज चर्चा होते. त्यासाठी स्मार्ट सिटीकडून दीडशे कोटी, तर एनटीपीसीकडून दोनशे कोटी रुपयांचा निधीही मंजूर करण्यात आला आहे.

 मात्र शासनाकडून याबाबत कोणताही निधी मंजूर करण्यात आला नसल्याने त्याच्या प्रत्यक्ष अंमलबजावणीला मात्र मुहूर्त सापडत नाही. 24 जुलै ते 29 जुलै दरम्यान अमृत योजनेंतर्गत उजनीपासून ते सोलापूरपर्यंतचे 17 वॉल बदलण्यात आले आणि दीड किलोमीटरची जलवाहिनी बदलण्यात आली. त्यामुळे पाण्याची गळती थांबून तब्बल सात दशलक्ष पाण्याची वाढ झाली. उजनी व टाकळी येथे प्रत्येकी सहा, तर सोरेगाव येथे चार पाणी उपसा करणार्‍या  450  अश्‍वशक्तीच्या वीस वर्षे जुन्या मोटारी आहेत. त्यामुळे त्यांची क्षमता स्वाभाविकच कमी झाली आहे. त्यामुळे या मोटारी बदलण्यासाठीही सुमारे बारा कोटींचा निधी लागणार असून अमृत योजनेमार्फत तो  येणार आहे. त्याचे काम झाल्यास आणखी पाणी वाढण्याची शक्यता आहे. 

त्यामुळे या सर्व शक्य असणार्‍या गोष्टी साध्य झाल्या, तर सोलापुरात दररोज दोनशे दशलक्ष लिटरपेक्षा अधिक पाणी उपलब्ध होणार आहे. त्यानंतर टप्प्याटप्प्याने या अंतर्गत जलवाहिन्यांच्या जाळ्यांचे नूतनीकरण झाल्यास सोलापूराला आणखी 30 वर्षे रोज पाणीपुरवठा करण्यास कोणतीही अडचण येणार नाही. यासाठी राज्यशासनाकडून पाठबळ आणि महापालिकेतील सत्ताधार्‍यांमधील दुफळी बंद करून सोलापूरच्या विकासासाठी एकत्र येणे गरजेचे आहे.