Thu, Apr 25, 2019 15:52होमपेज › Solapur › महापालिकेचे पदाधिकारीच जर बेताल झाले तर...

महापालिकेचे पदाधिकारीच जर बेताल झाले तर...

Published On: Aug 07 2018 1:02AM | Last Updated: Aug 06 2018 8:39PMसोलापूर : दीपक होमकर 

तब्बल चाळीस वर्षांनंतर महापालिकेत सत्तांतर होऊन भाजपच्या हाती सोलापूरकरांनी मोठ्या विश्‍वासाने सत्ता दिली खरी; मात्र सत्तेत असताना नेमकी भूमिका काय असते याची माहितीच भाजपच्या नगरसेवकांना नाही. सत्ताधारी म्हणजे आपण मालकच झालो, असा फाजिल आत्मविश्‍वास बळावल्यामुळे महापालिकेतील सभागृहनेते संजय कोळी यांचे वर्तन बेताल होत आहे. 

पाईपलाईनमधून  गढूळ पाणी येणे ही प्रशासनाची चूक असली तरी त्याची अंतिम जबाबदारी ही सत्ताधार्‍यांची आहे. त्यामुळे प्रशासनाला विश्‍वासात घेऊन किंवा शासन करून त्यांच्याकडून काम करून घेणे ही भूमिका सभागृहनेते म्हणून संजय कोळी यांच्याकडून अपेक्षित होती. मात्र  अधिकार्‍यांना कामानिमित्त नागरिकांच्या जमावात बोलावून त्यांचा तृतीयपंथीयांच्या हस्ते सत्कार केला गेला. त्यामुळे कोळींनी स्वतःच त्यांच्या उथळ नेतृत्वाचे दर्शनच तृतीयपंथीयांसह सामान्य जनता आणि महापालिका विरोधकांना घडवून दिले. गेल्या तीस वर्षांत उजनी जलवाहिनीच्या दुरुस्तीचे इतक्या मोठ्या प्रमाणात कधीच काम झाले नव्हते तितक्या मोठ्या प्रमाणात काम पहिल्यांदाच झाले. 

त्यामुळे त्यात चुका  होतील याचा अंदाज प्रशासन आणि सत्ताधार्‍यांना आला होता. मात्र नेमक्या दुरुस्तीच्या वेळी महापौर आणि आयुक्त हे ‘स्मार्ट सिटी’च्या बैठकीसाठी लखनौच्या नियोजित दौर्‍यावर गेले. त्यामुळे महापौरानंतर सर्वात महत्त्वाचे पदाधिकारी म्हणून सभागृहनेते कोळी यांनी या कामाचे नेतृत्व करत तेथे येणार्‍या अडचणी सोडविण्याची भूमिका अपेक्षित होती. मात्र एखाद्या विरोधी पक्षाप्रमाणे  काम करणार्‍यांच्या चुका काढून त्यांच्यावर जाहीर टीका करणे, जनतेची लोकप्रियता मिळविणे, प्रसिध्दीसाठी स्टंट करणे यातच ते वाहवत गेल्याचे स्पष्ट होते. तृतीयपंथीयांच्या हातून अधिकार्‍यांचा सत्कार  करत महापालिकेतील अधिकारी जणू ढिम्म आहेत आणि अशा सत्कारामुळे आम्हीच कसे कर्तबगार आहोत अशी भावना त्यांची होत असेल तर त्यांनी अवघ्या प्रशासनालाच हीन लेखले आहे. मात्र तृतीयपंथीयांनाही जाहीरपणे हीन लेखत त्यांची बदमानी करण्याचा गुन्हाही केला आहे.

तृतीयपंथीयांकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलण्यासाठी एकीकडे जगभर प्रयत्न  केले जात आहेत. भारतात अनेक ठिकाणी त्यांना निवडणुकीत उभे राहायची संधी दिली जात असताना त्यांच्या हस्ते सत्कार म्हणजे उपरोध असे मानून कोळींनी केलेले कृत्य त्यांना स्वतःला, सभागृहनेते म्हणून महापालिकेला आणि भारतीय जनता पक्षाचे जबाबदार नेते म्हणून भाजप पक्षालाही न शोभणारे  आहे. त्यामुळे अशा बेताल नेत्यावर शिस्तप्रिय पक्षाकडूनही कानउघडणी आवश्यक आहेच.