Tue, Apr 23, 2019 19:51होमपेज › Solapur › दर्जा नगरपरिषदेचा आणि कारभार ग्रामपंचायतीचा

दर्जा नगरपरिषदेचा आणि कारभार ग्रामपंचायतीचा

Published On: Mar 05 2018 1:45AM | Last Updated: Mar 04 2018 10:10PM सोलापूर :  महेश पांढरे

सोलापूर जिल्ह्यात नव्याने स्थापन झालेल्या मोहोळ, माढा आणि माळशिरस  नगरपरिषदांमध्ये शासनाच्या आकृतीबंदाप्रमाणे कर्मचार्‍यांची भरती झालेली नाही, तर या तिन्ही नगरपरिषदांमध्ये प्रभारी मुख्याध्यापकांची नेमणूक आहे. त्यामुळे दर्जा नगरपरिषदांचा आणि कामकाजाची पध्दत ग्रामपंचायतीप्रमाणे अशी अवस्था या नगरपरिषदांची झाली आहे. त्यामुळे त्या-त्या नगराध्यक्षासह सर्वसामान्य जनता ही वैतागली आहे.

नव्याने स्थापन झालेल्या नगरपरिषदांमध्ये पायाभूत सुविधा पुरविण्यासाठी पहिल्या टप्प्यातच प्रत्येकी 1 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. यामधून पहिल्यांदा इमारत आणि त्याठिकाणी विविध विभागासाठी आवश्यक असणारी कार्यालये स्थापन करण्यात येणार आहेत. त्यानंतर त्या-त्या नगरपरिषदांना लोकसंख्येच्या प्रमाणात शासनाच्या विविध योजनांमधून निधी देण्यात येणार आहे. मात्र नव्याने स्थापन झालेल्या नगरपरिषदांना आता दोन वर्ष पूर्ण होत आली तरी त्याठिकाणी पायाभूत सुविधा उपलब्ध करुन देण्यास शासन अपयशी ठरले आहे.  तर दुसरीकडे नगरपरिषदेचा दर्जा मिळाल्याने याठिकाणी असणार्‍या लोकांच्या अपेक्षाही उंचावल्या असल्या तरी त्यांना त्या अपेक्षेप्रमाणे विकास कामे होताना दिसून येत नाही. त्यामुळे जनता आता वैतागली आहे. मोहोळ, माढा आणि माळशिरस नगरपरिषदांमध्ये मुख्याधिकारी आणि अभियंत्याची पदे प्रभारी आहेत. त्यामुळे प्रमुख अधिकार्‍यांना चार दिवस इकडे तर चार दिवस तिकडे काम करावे लागत आहे. तर दुसरीकडे लोकप्रतिनिधी म्हणून काम करीत असलेल्या नगरसेवकांकडे विविध विकासकामांसाठी लोकांचा रेटा वाढला असला तरी जबाबदार अधिकारी कार्यालयात वेळेवर नसल्याने विकास कामे करताना त्यांचीही दमछाक होत आहे. त्यामुळे शासनाने रिक्त पदे तात्काळ भरुन प्रमुख अधिकार्‍यांची नेमणूक करावी, अशी मागणी सर्व नगरपरिषदांच्या नगराध्यक्षांनी केली आहे.