Wed, Jul 17, 2019 10:53होमपेज › Solapur › मनपा प्रशासनाच्या चालीने पदाधिकारी बनले ‘बाहुले’

मनपा प्रशासनाच्या चालीने पदाधिकारी बनले ‘बाहुले’

Published On: May 07 2018 2:05AM | Last Updated: May 06 2018 8:18PMसोलापूर : वेणुगोपाळ गाडी

महापालिकेतील प्रशासनाच्या मनमानी कारभाराचे अनेक नमुने पहावयास मिळत आहेत. मनपाच्या कारभारावर आपलेच वर्चस्व राहावे, असा खटाटोप प्रशासनाचा असल्याचे यातून स्पष्टपणे जाणवत आहे. प्रशासनाच्या या सोयीच्या चालीमुळे मनपाचे पदाधिकारी हे चक्क प्रशासनाच्या हातातील बाहुले बनल्याचे चित्र दिसत आहे, तर दुसरीकडे प्रशासनाच्या मनमानीला कंटाळलेल्या  विरोधकांना चक्क न्यायालयात जायची वेळ आली आहे. 

सव्वा वर्षांपूर्वी महापालिकेत सत्तांतर झाले. सुमारे 50 वर्षे सत्तेवर असलेल्या काँग्रेसला पराभूत करून भाजप सत्तारुढ झाला. सत्तांतर झाल्यामुळे तसेच ‘गल्ली ते दिल्ली’ भाजपची सत्ता आल्याने शहराचा भरीव विकास चांगल्या गतीने होईल, अशी आशा भोळीभाबडी असलेल्या सोलापूरकरांची होती, मात्र भाजपअंतर्गत पालकमंत्री-सहकारमंत्री या दोन गटांच्या वादाचा तमाशा पाहण्याची दुर्दैवी वेळ शहरवासीयांवर आली. निधीअभावी तसेच मक्तेदार काम घेण्यास राजी नसल्याने विकासकामे झाली नसल्याचे सत्ताधारी पहिल्या वर्षीच्या परीक्षेत ‘नापास’ ठरले आहेत.

सत्ताधारी गटांतटांमधील वादामुळे तसेच विरोधकांच्या निष्क्रियतेमुळे  वर्षभरापासून प्रशासनावर कोणाचा अंकुश राहिला नाही. त्यामुळे प्रशासनाचे चांगलेच फावत आहे. अलीकडे सत्ताधार्‍यांमधील अंतर्गत वाद कमी होत असल्याच्या पार्श्‍वभूमीवर विरोधक एकत्र आल्याचे दिसून येत आहे. स्थायी समिती सभापतीपदाच्या निवडणुकीवेळी हे जाणवले. ही निवडणूक वादग्रस्त ठरली अन् वाद न्यायालयात गेला. दरम्यान, प्रशासन या वादाचे कारण देत स्थायी समितीकडे पाठवायचे विषय थेट सर्वसाधारण सभेकडे पाठविण्याचे काम करीत आहे. हे कायदेशीर की बेकायदेशीर यावरून सध्या खल होत आहे.  समितीची विशेष सभा तसेच हंगामी सभापती निवडीची मागणी सदस्यांकडून झाली. याबाबत त्यांनी प्रशासनाला पत्रही दिले, मात्र प्रशासनाने याबाबत आपल्या सोयीची चाल खेळली आहे. या पत्रावर नियम दाखवून देणे प्रशासनाचे काम होते, मात्र प्रशासनाने सदस्यांच्या पत्राबाबत विधी सल्लागारांचा अभिप्राय मागविण्याचा निर्णय घेऊन एकप्रकारे जाणीवपूर्वक वेळकाढूपणा तसेच सदस्यांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला, हे स्पष्टपणे जाणवत आहे.

निवडून आलेल्या नगरसेवकांपैकी बहुतांश नगरसेवक हे नवखे असल्याने त्यांना नियमांची माहिती नाही व जे अनुभवी वा ज्येष्ठ नगरसेवक आहेत, ते याबाबत मूग गिळून गप्प आहेत. कारभारावर आपलेच वर्चस्व असावे या उद्देशाने प्रशासन वेगळीच चाल खेळत आहे, असे बोलले जात आहे. तसेच दुसरीकडे एका मंत्र्यांच्या सांगण्यानुसार प्रशासन काम करीत आहे, असा आरोपही केला जात आहे. प्रशासनाच्या मनमानीमुळे मनपाचे पदाधिकारी हे प्रशासनाच्या हातातील बाहुले बनले आहेत.

एकंदर प्रशासन निरंकुश बनले आहे. हंगामी सभापती निवडीबाबत स्थायी सदस्यांनी महापौरांना पत्र देणे अपेक्षित आहे, असे उत्तर मनपा सभेत एका प्रश्‍नाच्या उत्तरादाखल प्रशासनाकडून देण्यात आले. यावरुन विरोधी पक्ष शिवसेनेने ‘मग हे आधीच का सांगितले नाही’, असे म्हणत प्रशासनाच्या चुकीच्या कारभाराचे वाभाडे काढले. एवढेच नव्हे न्यायालयात जाण्याचा इशाराही शिवसेनेने दिला आहे. जर शिवसेना न्यायालयात गेली तर प्रशासनाच्या मनमानी कारभाराला न्यायालयाकडून चाप बसणार का, याविषयी उत्सुकता आहेच, शिवाय आगामी काळात सत्ताधारी-विरोधक या दोहोंनी प्रशासनाच्या मनमानीला लगाम न घातल्यास मनपावर भाजपचे नव्हे तर प्रशासनाचे ‘राज्य’ आहे, असे खेदाने म्हणण्याची नामुष्की येईल. 

Tags : Solapur, Municipal, Corporations, doll, become, office, bearer