Fri, Jul 19, 2019 22:58होमपेज › Solapur › आयुक्‍तांना गरज ‘मॉरल सपोर्ट’ची!

आयुक्‍तांना गरज ‘मॉरल सपोर्ट’ची!

Published On: Feb 21 2018 1:19AM | Last Updated: Feb 20 2018 10:28PMसोलापूर : वेणुगोपाळ गाडी

महापालिकेबरोबरच शहरालाही शिस्त लावून हे शहर ‘स्मार्ट’ करण्याचा अजेंडा राबवू इच्छिणार्‍या महापालिका आयुक्‍त डॉ. अविनाश ढाकणे यांना ‘मॉरल सपोर्ट’ अर्थात ‘नैतिक पाठबळ’ देण्याची गरज आहे. जर हे पाठबळ त्यांना न मिळाल्यास शहराचे चित्र बदलणे अशक्य आहे.

डॉ. ढाकणे यांनी 2 मे 2017 रोजी सोलापूर मनपा आयुक्‍तपदाची सूत्रे हाती घेतली. गत नऊ महिन्यांच्या कालावधीत त्यांनी अनेक धाडसी निर्णय घेऊन आपल्या कामाची छाप पाडली आहे. बहुचर्चित वादग्रस्त घनकचरा व्यवस्थापनाचा मक्‍ता रद्द करून आपले प्रशासन पारदर्शी व लोकाभिमुख असल्याचे दाखवून दिले. तीन वर्षांहून अधिक काळ एकाच ठिकाणी ठाण मांडून असलेल्या अधिकारी-कर्मचार्‍यांच्या त्यांनी बदल्या केल्या. महसुलाचे उद्दिष्ट वेळेवर गाठता यावे  याकरिता त्यांनी कडक पावले उचलली. या अनुषंगाने घेण्यात येत असलेल्या विशेष मोहिमेतून चांगली वसुली केली जात आहे. सन 2010 पासून मनपा गाळ्यांचे भाडेवाढ न झाल्याने मनपाचा कोट्यवधींचा महसूल बुडत आहे. तीन वर्षांपूर्वी तत्कालीन आयुक्‍त चंद्रकांत गुडेवार यांनी गाळेभाडेवाढ करण्यासाठी लिलाव पद्धतीचा निर्णय घेतला. याला मोठा विरोध झाला. याबाबत स्थानिक मंत्र्यांवर दबाव आल्याने त्यांनी या निर्णयामध्ये हस्तक्षेप केला, पण त्याला आयुक्‍तांनी जुमानले नाही. परिणामी राजकीय दबंगगिरीतून गुडेवारांची बदली झाली. एक तर सोलापुरात चांगले अधिकारी येत नाहीत आणि जर आलेच तर येथील घाणेरड्या राजकारणामुळे टिकत नाहीत, असा आजवरचा अनुभव आहे. गाळेभाडेवाढीसंदर्भात गुडेवारांबाबत जे झाले ते डॉ. ढाकणे यांच्याबाबतही होणार नाही कशावरून?

सोलापूरकरांना चांगले प्रशासन व मूलभूत सुविधा हव्या आहेत. हे शहर खरोखरच स्मार्ट व्हावे, अशी त्यांची इच्छा आहे. हे जरी बरोबर असले तरी शहरातील चांगल्या अधिकार्‍यांना शहरवासीयांनी नैतिक पाठबळ देणे तितकेच गरजेचे आहे. पण असे पाठबळ मिळत नसल्याने गुडेवार, तुकाराम मुंढे यांच्यासारख्या चांगल्या अधिकार्‍यांच्या राजकीय दबावातून केलेल्या बदल्या रोखता आल्या नाहीत, हे भयाण वास्तव कोणालाही नाकारता येणार नाही.

मनपा आयुक्‍त डॉ. ढाकणे हे महसुलाच्या वसुलीसाठी कडक भूमिका घेण्यावर जसे भर देत आहेत. त्याचपद्धतीने त्यांनी बेकायदेशीर बांधकाम तसेच अतिक्रमणावर कारवाई करणे, शासनाच्या गुंठेवारी तसेच अनधिकृत बांधकाम नियमितीकरण योजनांवरदेखील लक्ष केंद्रीत केले आहे. याबाबत त्यांनी लोकांना वेळोवेळी आवाहनही केले व करीत आहेत. मात्र त्याला ‘ठंडा’ प्रतिसाद मिळत असल्याचे दिसत आहे. त्यामुळे आता नाईलाजास्तव कर्तव्यकठोर पद्धतीने काम करण्याची वेळ आयुक्‍तांवर आली आहे. 

लवकरच थकीत मिळकतकराबाबत ते मालमत्ता लिलाव करण्याच्या कटू कारवाईचा अवलंब करणार आहेत. एलबीटी वसुलीमध्ये ‘गडबड’ झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आल्याने त्याचा छडा लावणार आहेत.  मनपा पदाधिकारी, लोकप्रतिनिधी आदींना विश्‍वासात घेऊन काम करण्याची त्यांची पद्धत आहे. मात्र दबावाला ते भीक घालत नाहीत. या पार्श्‍वभूमीवर डॉ. ढाकणे हे यापुढील काळात  कर्तव्यकठोर होणार असल्याने संघर्ष निर्माण होण्याची शक्यता आहे. 

प्रशासनाबरोबरच शहरालाही शिस्त लावण्याचा त्यांचा संकल्प आहे. याकामी त्यांना गरज आहे ‘मॉरल सपोटर्र्’ची. कारण या सपोर्टशिवाय आपण चांगले व धाडसी काम करु शकणार नाही, असे त्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे त्यांच्या हाकेला सोलापूरकरांनी प्रतिसाद देणे अपेेक्षित आहे अन्यथा काय होईल हे सांगण्यासाठी ज्योतिषाची गरज नाही, एवढे मात्र नक्‍की.