होमपेज › Solapur › सभापतिपदाची माळ दिलीप मानेंच्या गळ्यात

सभापतिपदाची माळ दिलीप मानेंच्या गळ्यात

Published On: Jul 17 2018 1:47AM | Last Updated: Jul 17 2018 1:44AMसोलापूर : प्रतिनिधी

सोलापूर कृषी उत्पन्‍न बाजार समितीच्या सभापतिपदी माजी आमदार दिलीप माने यांची, तर उपसभापतिपदी श्रीशैल नरोळे यांची सोमवारी बिनविरोध निवड करण्यात आली. बाजार समितीच्या कार्यालयात घेण्यात आलेल्या संचालक मंडळाच्या पहिल्या बैठकीत निवडणूक निर्णय अधिकारी ज्योती पाटील यांच्या अध्यक्षतेखाली ही निवड करण्यात आली.

सकाळी अकरा वाजता बाजार समितीच्या सभागृहात घेण्यात आलेल्या या निवडीप्रसंगी सभापतिपदी माने, तर उपसभापतिपदी नरोळे यांचे प्रत्येकी एकच अर्ज प्राप्‍त झाल्याने ही निवडणूक अविरोध ठरली. यावेळी बाजार समितीचे संचालक जितेंद्र साठे, प्रकाश वानकर, राजकुमार वाघमारे, इंदुमती अलगोंडा-पाटील, बाळासाहेब शेळके, प्रकाश चोरेकर, नामदेव गवळी, विजया भोसले, अमर पाटील, आप्पासाहेब पाटील, रामप्पा चिवडशेट्टी, बसवराज इटकळे, केदार उबंरजे, शिवानंद पुजारी आदी उपस्थित होते. 

अविरोध निवड घोषित झाल्यानंतर सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्या गटातून निवडून आलेले संचालक आप्पासाहेब पाटील व रामप्पा चिवडशेट्टी यांनी सभागृहातून काढतापाय घेतला. नूतन सभापती माने व उपसभापती नरोळे यांच्या सत्कारासाठी यावेळी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती. बाजार समितीच्या आवारात निवडीनिमित्ताने पोलिसांनी चोख बंदोबस्त तैनात केला होता. सभापती व उपसभापतीपदाची निवड ही सभेपूर्वी सुशीलकुमार शिंदे यांच्या बंगल्यावर निश्‍चित करण्यात आल्याने बाजार समितीत संचालक येण्यापूर्वीच काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी यावेळी हलग्या वाजवित विजयी आनंदोत्सव साजरा केला. निवडीनंतर पुन्हा फटाके फोडून व पेढे वाटून जल्‍लोष साजरा करण्यात आला. 

बाजार समितीची निवडणूक ही एक झलक असून दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघातून पुन्हा दिलीप मानेच आमदार होणार असल्याचे डिजिटल फलक यावेळी बाजार समितीत लावून काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी सहकारमंत्री सुभाष देशमुख यांना टोला देण्याचा प्रयत्न केल्याचे यावेळी दिसून आले. सभापती व उपसभापतीपदाची निवड झाल्याने बाजार समितीच्या प्रशासकांनी या दोन्ही पदांसाठी दालने खुले करण्याची तयारी निवडीनंतर सुरू केल्याचेही दिसून आले. 

सभापती दिलीप माने यांच्या अर्जावर बाळासाहेब शेळके यांनी सूचक म्हणून, तर प्रकाश वानकर यांनी अनुमोदक म्हणून स्वाक्षरी केली. उपसभापती नरोळे यांच्या अर्जावर सूचक म्हणून जितेंद्र साठे, तर अनुमोदक म्हणून प्रकाश वानकर यांनी स्वाक्षरी केली. नुकत्याच झालेल्या बाजार समितीच्या निवडणुकीत सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्याविरोधात काँग्रेसच्या सर्व नेत्यांनी व पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांनी आव्हान उभे केले होते. यात पालकमंत्री देशमुख व दिलीप माने यांच्या गटास घवघवीत यश मिळाले होते.