होमपेज › Solapur › मुद्रा कर्ज योजना नुसताच बोलबाला

मुद्रा कर्ज योजना नुसताच बोलबाला

Published On: Feb 11 2018 12:57AM | Last Updated: Feb 10 2018 8:58PMअकलूज: वार्ताहर

देशातील तरुण उद्योजकांना व्यवसायासाठी आर्थिक मदतीचा हात देण्याचे दृष्टीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विना जामीन व विनातारण अशा या कर्जयोजनेची घोषणा केली व अनेक युवकांनी त्यामाध्यमातून अच्छे दिनची स्वने बघितली,परंतु प्रत्यक्ष कागदपत्र हातात घेऊन बँकेत गेल्यावर व हेलपाटे मारल्यावर मात्र हा नुसताच बोलबाला असल्याचे अनेकांच्या लक्षात आले.

ग्रामीण भागातील तरुणांना कोणताही व्यवसाय करायचे म्हटले की मूळ अडचण येते ती भांडवलाची,कोणत्याही बँका वशिल्याशिवाय उभा करीत नाहीत,खाजगी सावकारी परवडत नाही. त्यामुळे अनेकदा मनात असूनही व तेवढी मनाची ,कष्ट करण्याची क्षमता असूनही नाईलाजाने मिळेल त्या नोकर्‍या शोधाव्या लागतात.ही तरुणाईची, व्यवसाय करू पाहणार्‍या बहुतेकांची अनेक वर्षा   पासूनची समस्या आहे.परंतु गत लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदीनी तरुणाईला अच्छे दिन चे स्वप्न दाखवले. परिणामी युवक वर्ग मोठ्यासंख्येने भाजपच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिला. सत्ता प्राप्तीनंतर अश्‍वासनाप्रमाणे पंतप्रधानांनी व्यावसायिकांना भांडवल उभारणीसाठी मुद्रा कर्ज योजना सुरू केली, त्याची जाहिरातही मोठ्या प्रमाणावर झाली. व या व्यावसायिकांच्या अनेक वर्षांपासूनच्या आशा पल्लवीत झाल्या.व ही योजना जाहीर झाल्यापासून या वर्गाने बँकेत गर्दी करण्यास सुरुवात केली. परंतु बहुतेक बँकांनी सुरुवातीपासूनच अशा योजनेतील कर्ज देण्यास ना चा पाढा सुरु केला.जिल्हाधिकार्‍यांसह सर्वच संबंधित अधिकारी वर्गाने बँकांना याबाबतीत अनेकदा तम्बी देऊनही या नवउद्योजकांच्या हाती फारसे काही हाती लागले नाही. उलट बँकांनी आपल्या विश्‍वासातील खातेदारांनाच या योजनेचा लाभ देऊन कोटा पूर्ण केल्याचे सांगितले जाते. मग पुन्हा या व्यावसायिकांच्या पदरी हेलपाटेच आले. अनेकांनी निराश होऊन नाद सोडून दिला तर काहींनी मोजक्यानी पिच्छा पुरवला. अशा पिच्छा पुरवणार्‍याना या योजनेचा लांभ दिला गेला असला तरी धड त्या व्यावसायिकांचा व्यवसाय सुरु करता येणार नाही की बंद करता येणार नाही अशी अवस्था करून ठेवली.अकलूज लगतच्या माळेवाडी येथील एकाने तर मुद्राचे प्रकरण होतेय म्हणून सुमारे दहा लाखाची खाजगी कर्ज काढून गुंतवणूक करून व्यवसाय उभा केला व नंतर मात्र बँकेने हात वर केले,अखेर त्याने या बँकेसमोर प्राणांतिक उपोषणाचा मार्ग अवलंबला,तेव्हा कुठे त्याचा प्रश्‍न मार्गी लागला.परंतु एवढे कुणी ताणत नसल्याचेच दिसते.त्यामुळे या कर्ज योजनेची जेवढ्या प्रमाणात जाहीरातबाजी झाली त्याप्रमाणात व्यावसायिकांना लाभ झाल्याचे दिसत नाही, उलट बोलबालाच जास्त झाल्याचे दिसत आहे.