होमपेज › Solapur › धनगर आरक्षणासाठी कृती समिती जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार!

धनगर आरक्षणासाठी कृती समिती जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार!

Published On: Aug 13 2018 1:21AM | Last Updated: Aug 13 2018 1:21AMसोलापूर : प्रतिनिधी 

धनगर समाजाला एसटी प्रवर्गाच्या आरक्षण शिफारशी तत्काळ लागू कराव्यात. तसेच सोलापूर विद्यापीठाला अहिल्यादेवी होळकर यांचे नाव देण्यात यावे, अशा प्रमुख दोन मागण्यांसाठी गेल्या अनेक दिवसांपासून धनगर समाज आंदोलने करीत आहे. त्याच पार्श्‍वभूमीवर शासनाला जाणीव करून देण्यासाठी येत्या 24 ऑगस्टला जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढून दिवसभर ठिय्या आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती धनगर कृती समितीच्या वतीने नगरसेवक चेतन नरोटे यांनी दिली.

13 ऑगस्ट रोजी महाराष्ट्र बंद करण्यात येत असल्याच्या अफवा सोशल मीडियाच्या माध्यमातून पसरवल्या जात आहेत; मात्र धनगर आरक्षणासाठी काम करणार्‍या अनेक संघटना असल्या तरी कोणत्याच संघटनेने महाराष्ट्र बंदची हाक दिलेली नाही; मात्र काही लोकांनी वेगवेगळ्या प्रकारे आंदोलने चालू ठेवण्याचे आवाहन केले आहे. त्यामुळे धरणे आंदोलने, तहसीलदारांना निवेदने अशा प्रकारची आंदोलने काही संघटना करणार आहेत. 

महाराष्ट्र बंदशी धनगर आरक्षण कृती समितीचा संबंध नसल्याचा खुलासा यावेळी करण्यात आला; मात्र धनगर समाज संघटनेने दिल्याप्रमाणे 29 नंबरला एसटीमध्ये समाविष्ट आहे. त्यामुळे धनगर समाजाला नव्याने आरक्षण देण्याची गरज असून त्या आरक्षणाच्या शिफारशी लागू करून विविध लाभ देण्याची गरज असल्याचे मत अनेकांनी मांडले. जोपर्यंत केंद्र आणि राज्यशासन धनगर समाजाला एसटी प्रवर्गाच्या सवलती लागू करीत नाही, तोपर्यंत ही आंदोलने चालू ठेवण्यात येणार असल्याची माहिती कृती समितीच्या वतीने देण्यात आली. त्याचे पुढचे पाऊल म्हणून येत्या 24 ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढून त्याठिकाणी ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा कृती समितीच्यावतीने दिला आहे. 

बाळासाहेब शेळके, अर्जुन सलगर, विलास पाटील, सुनील खटके, सुनील बंडगर, संतोष वाकसे, शेखर बंगाळे, बिपीन पाटील, उमेश काळे, जयवंत सलगर, विलास मोेटे, सुधीर सलगर, संतोष बंडगर, निमिषा माने, सिध्देश्‍वर बेडगनूर, दिगंबर मेटकरी, महेश गाडेकर आदी उपस्थित होते.