Thu, Mar 21, 2019 11:05होमपेज › Solapur › दोन मुलींचे हत्याकांड; निर्दयी मातेस जन्मठेप

दोन मुलींचे हत्याकांड; निर्दयी मातेस जन्मठेप

Published On: Aug 31 2018 1:43AM | Last Updated: Aug 30 2018 10:46PMसोलापूर : प्रतिनिधी

अनैतिक संबंधास अडसर ठरणार्‍या पोटच्या दोन मुलींचा धारदार शस्त्राने खून करून स्वतः आत्महत्येचा प्रयत्न करणार्‍या आईस गुरुवारी जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. एम. पाटील यांनी जन्मठेपेची शिक्षा ठोठावली. तसेच 20 वर्षे शिक्षा भोगेपर्यंत शिक्षा कमी न करण्याचा आदेशही राज्य सरकारला दिला आहे. या दुहेरी हत्याकांडाने सोलापूरसह राज्यात खळबळ उडाली होती. 

भारती पप्पू राठोड (वय 28, रा. तेरामैल, बसवनगर, ता. दक्षिण सोलापूर) असे जन्मठेप सुनावलेल्या आईचे नाव आहे. न्यायालयात त्या आईस अश्रू आवरता आले नाहीत. माणुसकीला काळिमा फासणारे कृत्य आपण केल्याने तिने न्यायालय आवारात आपला चेहरा लपवण्याचा प्रयत्न केला. 

22 नोव्हेंबर 2015 रोजी सकाळी 11 ते साडेअकरा वाजण्याच्या सुमारास राहत्या घरी अनैतिक संबंधास अडसर ठरणार्‍या काजल व सोनाली या मुलींवर सुर्‍याने पोटात वार करून जिवे ठार मारले. स्वतःही त्याच सुरीने वार करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. आरोपीचा दीर शंकर महादेव राठोड यांनी मंद्रुप पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला. या गुन्ह्याचा तपास सहायक पोलिस निरीक्षक बाळकृष्ण त्रिपुटे, पीएसआय विक्रांत हिंगे यांनी करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. या खटल्यात एकूण नऊ साक्षीदार तपासण्यात आले. त्यापैकी प्रत्यक्षदर्शी बालसाक्षीदार दीपा महादेव राठोड (वय 11) आणि वैशाली महादेव राठोड (वय 15) यांची साक्ष अतिशय महत्त्वाची ठरली. सरकार पक्षाने दोन्ही बाल साक्षीदार हे नेत्रसाक्षीदार महत्त्वाचे असल्याचे सांगून परिस्थितीजन्य पुरावा असल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. आरोपीने तिच्या दोन्ही मुलींचा खून केल्याचे सिद्ध केले. 

उच्च न्यायालय व सर्वोच्च न्यायालयाचे न्यायनिवाडेदेखील न्यायालयात सादर केले. खुनी आरोपी महिलेचा गुन्हा गंभीर स्वरुपाचा आहे. तिने अनैतिक संबंधात अडसर ठरणार्‍या पोटच्या मुलींचा अत्यंत निर्घृण खून केला आहे. त्यामुळे तिला फाशीची शिक्षा देण्याची मागणी सरकार पक्षाने केली. मात्र न्यायालयाने आरोपी महिला असल्याने तिला जन्मठेपेची शिक्षा सुनावली. तसेच शिक्षा भोगेपर्यंत 20 वर्षांपर्यंत शिक्षा कमी करू नये आणि दहा हजार रुपयांची दंडाची शिक्षा ठोठावली, दंड न भरल्यास सहा महिने कारावासाची शिक्षाही सुनावली. यात सरकार पक्षातर्फे जिल्हा सरकारी वकील प्रदीपसिंग राजपूत, तर आरोपीतर्फे अ‍ॅड. श्रीकांत गडदे यांनी काम पाहिले. कोर्टपैरवी म्हणून मंद्रुप पोलिस ठाण्याचे पोलिस हवालदार विजय जाधव यांनी काम पाहिले.