Tue, Dec 10, 2019 14:13होमपेज › Solapur › सासू, मेव्हण्याने केला जावयाचा खून 

सासू, मेव्हण्याने केला जावयाचा खून 

Published On: Jun 26 2019 1:40AM | Last Updated: Jun 26 2019 1:40AM
मोहोळ : वार्ताहर

घराच्या जागेच्या कारणावरून जावयास मारहाण केल्याने त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. मात्र, ही बाब लपवून ठेवत फेपरे आल्याने त्यांचा मृत्यू झाल्याचा बनाव करणार्‍या सासू आणि मेव्हण्याच्या विरोधात 24 जून रोजी मोहोळ पोलिसांत खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. 

हुसेनबी रमजान शेख आणि महेबूब रमजान शेख (रा. मोहोळ, जि. सोलापूर) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे असून राजेभाई सय्यद पठाण (रा. कुरनूर, ता. अक्‍कलकोट) असे खून झालेल्या व्यक्‍तीचे नाव आहे.

याबाबत मोहोळ पोलिस सूत्रांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, राजेभाई सय्यद पठाण (वय 40, रा. कुरनूर, ता. अक्कलकोट) हे पत्नी आणि दोन मुलींसह मोहोळ येथे सासुरवाडीत राहण्यास होते. त्यांच्या सासूने मोहोळ शहरातील क्रांतीनगर परिसरात एक प्लॉट विकत घेतला होता. त्यासाठी राजेभाई पठाण यांनी पैसे दिले होते. त्यामुळे ते कुटुंबासह त्या घरजागेत पत्राशेड मारून राहत होते. काही दिवसांपूर्वी त्यांची पत्नी घर सोडून कुठेतरी निघून गेली. तसेच त्यांच्या दोन मुलीही मुंबई येथे नातेवाईकांकडे असल्यामुळे ते एकटेच सदर पत्राशेडमध्ये राहत होते. मात्र, त्यांची सासू आणि मेव्हणा त्यांना वारंवार घराची जागा खाली कर म्हणून भांडण-तंटा करायचे, परंतु सदर जागा खरेदी करण्यासाठी राजेभाई यांनी पैसे दिले असल्यामुळे ते सदरची जागा खाली करीत नव्हते. त्यामुळे त्यांच्यातील भांडण विकोपाला गेले होते. 

दरम्यान, 17 जून रोजी दुपारी बारा ते एक वाजण्याच्या दरम्यान राजेभाई यांची सासू हुसेनबी शेख आणि मेव्हणा महेबूब शेख हे क्रांतीनगर येथील प्लॉटवर आले. यावेळी त्यांनी राजेभाई यांच्या घरातील सामान बाहेर फेकण्यास सुरुवात केल्याने राजेभाई यांनी त्यास विरोध केला. यावेळी महेबूब शेख याने त्यांच्या डोक्यात लाकडी वासा घातल्याने ते बेशुद्ध होऊन खाली कोसळले. यावेळी त्यांनी राजेभाई यांना फेपरे आल्याचे कारण सांगून उपचारासाठी सोलापूर येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल केले. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी  सुरुवातीला सिव्हिल पोलिस चौकीत  अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती. सदरची नोंद चौकशीसाठी मोहोळ पोलिस ठाण्यात आल्यानंतर मोहोळचे पोलिस निरीक्षक सूर्यकांत कोकणे यांनी याप्रकरणाची सखोल चौकशी केली. यामध्ये सासू आणि मेव्हण्याने घराच्या जागेच्या कारणावरून त्यांना मारहाण करून खून केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला.

याप्रकरणी 24 जून रोजी रात्री उशिरा मोहोळ पोलिसांत वरील दोघांच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अद्यापपर्यंत कोणत्याही आरोपीस  अटक झाली नसून मोहोळ पोलिस त्यांचा शोध घेत आहेत. पोलिस निरीक्षक सूर्यकांत कोकणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक इंगळे हे या गुन्ह्याचा पुढील तपास करीत आहेत. या घटनेमुळे मोहोळ शहरात मोठी खळबळ उडाली आहे.