Mon, Jun 24, 2019 20:59होमपेज › Solapur › बालिकेशी गैरकृत्यप्रकरणी नराधमास सक्तमजुरी

बालिकेशी गैरकृत्यप्रकरणी नराधमास सक्तमजुरी

Published On: Jan 12 2019 1:33AM | Last Updated: Jan 11 2019 11:30PM
सोलापूर : प्रतिनिधी

शेजारच्या घरामध्ये सुरू असलेले रंगकाम पाहण्यासाठी गेलेल्या बालिकेचा रंगकाम करणार्‍या 60 वर्षीय आरोपीने विनयभंग करत तिच्याशी गैरकृत्य केले होते. याप्रकरणी शुक्रवारी आरोपीस सोलापूरच्या अतिरिक्त सत्र न्यायाधीश श्रीमती सावंत-वाघुले यांनी तीन वर्षांची सक्तमजुरी व 7 हजार रुपयांच्या दंडाची शिक्षा ठोठावली आहे. 

याबाबत सविस्तर असे की, 7 फेब्रुवारी 2013 रोजी सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास पीडित बालिका तिच्या घराशेजारील घरामध्ये चालू असलेले रंगकाम पाहण्यासाठी गेली होती. यावेळी त्या घरात रंगकाम करणारा आरोपी अशोक चाबुकस्वार (वय 60) याने या बालिकेला जवळ बोलावून तिच्याशी वाईट हेतूने छेडखानी करत गैरकृत्य केले. त्यावेळी तिने त्याच्या हातातून स्वतःची सुटका करून घेऊन घडलेली हकीकत तिच्या

 आईला सांगितली. त्यावेळी पीडितेच्या आई व वडिलांनी घडल्या प्रकाराबद्दल आरोपीस विचारणा केली असता त्याने माझ्या हातून चूक घडल्याचे कबुल केले. अशा आशयाची फिर्याद विजापूर नाका पोलिस ठाण्यात दाखल झाली होती. पोलिसांनी भादंविच्या 354 (1) 1 व बालकांवरील अत्याचार कायदा कलम 11 नुसार गुन्हा दाखल केला होता. तपासाअंती याबाबत न्यायालयात दोषारोपपत्र दाखल झाले होते.

या प्रकरणामध्ये सरकार पक्षातर्फे 5 साक्षीदार तपासण्यात आले. परिस्थितीजन्य पुरावा हा आरोपीने गुन्हा केल्याचे सिद्ध करणारा असल्याचा युक्तिवाद सरकारी वकिलांनी केला. हा युक्तिवाद ग्राह्य धरीत न्यायालयाने आरोपीस तीन वर्षांची सक्तमजुरीची शिक्षा व सात हजार रूपयांच्या दंडाची शिक्षा सुनावली. या प्रकरणात सरकार पक्षातर्फे अ‍ॅड. शीतल डोके, मूळ फिर्यादीतर्फे अ‍ॅड. पांढरे व आरोपीतर्फे अ‍ॅड. एच. एच बडेखान यांनी काम पाहिले.