Mon, May 20, 2019 22:44होमपेज › Solapur › वाळू तस्करांवर मोक्का

वाळू तस्करांवर मोक्का

Published On: May 09 2018 10:21PM | Last Updated: May 09 2018 10:09PMसोलापूर : प्रतिनिधी

मंगळवेढा येथील वाळू तस्करांवर मोक्काअंतर्गत कारवाई करण्याची विशेष पोलिस  महानिरीक्षक कोल्हापूर परिक्षेत्राकडून मंजुरी  मिळाली आहे. मोहोळ व मंगळवेढा परिसरातील वाळू तस्करीतील एकूण 13 आरोपींवर कारवाई करण्यात आली आहे.

23 एप्रिल रोजी पहाटे 4 .30 च्या सुमारास मौजे तांडोर (ता. मंगळवेढा) येथील हद्दीत भीमा नदीच्या पात्रात वाळूचे साठे करून ठेवले होते. राहुल रामेश्‍वर सरवळे (रा. मोहोळ), समाधान भारत सरवळे (रा. बेगमपूर, ता. मोहोळ) हे दोघे 2 ब्रास वाळू टेम्पोमध्ये घेऊन जात होते. पोलिसांच्या विशेष पथकाने त्यावर छापा टाकून गौणखनिज जप्त करण्याचा प्रयत्न केला होता.परंतु, संशयित आरोपी रवींद्र उर्फ पपल्या रामा काळे व त्याच्या इतर दहा साथीदारांनी कारवाई करण्यास आलेल्या  पोलिसांना शिवीगाळ करत दमदाटी केली होती व ट्रॅक्टर अंगावर घालून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला होता. पोलिसांनी या सर्व आरोपींविरुद्ध मंगळवेढा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता.

या टोळीतील रवींद्र ऊर्फ पपल्या रामा ऊर्फ रमेश काळे (रा. तामदर्डी, ता. मंगळवेढा, जि. सोलापूर) याने आर्थिक फायद्याकरिता टोळी निर्माण केली असल्याचे निष्पन्न झाले होते. या टोळीविरुद्ध मंगळवेढा पोलिस ठाण्यात  सदोष मनुष्यवध करणे व तसा प्रयत्न करणे, वाळू उपसा करून दरोडा घालणे, चोरी, सरकारी कामात अडथळा निर्माण करणे, बेकायदेशीर शस्त्र बाळगणे, असे अनेक गुन्हे दाखल आहेत. या टोळीविरुद्ध महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा (मोक्का) कारवाई करण्यात आली आहे. यामध्ये सचिन सुरेश काळे (तामदर्डी, ता. मंगळवेढा), सुरेश ऊर्फ बिगुल्या रामा काळे (रा. तामदर्डी, ता. मंगळवेढा), किशोर रामा काळे (रा. तामदर्डी, ता. मंगळवेढा), अमित शरण्णप्पा भोसले (रा. तामदर्डी, ता. मंगळवेढा), शंकू सुरेश काळे (रा. तामदर्डी, ता. मंगळवेढा), सूरज शरण्णप्पा भोसले (रा. तामदर्डी, मंगळवेढा), विक्या   भीमसिंग  भोसले (रा. तामदर्डी, ता. मंगळवेढा), शरद जाफर पवार (रा. सिध्दापूर, ता. मंगळवेढा), राहुल रामेश्‍वर सरवळे (रा. बेगमपूर, ता. मोहोळ), समाधान भारत सरवळे (बेगमपूर, ता. मोहळ), पृथ्वीराज भोसले (बेगमपूर, मोहोळ) यांच्याविरुध्द  मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली.