होमपेज › Solapur › ऑनलाईन सात-बारा प्रणाली; पुणे विभागामध्ये मोहोळ प्रथम

ऑनलाईन सात-बारा प्रणाली; पुणे विभागामध्ये मोहोळ प्रथम

Published On: Dec 28 2017 1:27AM | Last Updated: Dec 27 2017 8:37PM

बुकमार्क करा
मोहोळ ः महेश माने

महसूल प्रशासन लोकाभिमुख करण्यासाठी शासनाने राष्ट्रीय भूमी अभिलेखाचे संगणकीकरण हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प राज्यभर राबविला होता.  या प्रकल्पांतर्गत मोहोळ तालुक्यातील 104 गावांतील एकूण 95 हजारांपेक्षा जास्त 7/12 उतार्‍यांचे संगणकीकरण पूर्ण झाले असून खातेदारांना आता बिनचूक 7/17 व 8अ चे उतारे ऑनलाईन मिळण्यासाठीची कार्यवाही मोहोळ तालुक्याने पूर्ण केली आहे.  मोहोळ तालुका हा हे काम पूर्ण करणारा  जिल्ह्यातीलच नव्हे तर पुणे विभागातील पहिला तालुका ठरला असल्याची माहिती मोहोळचे तहसीलदार बी.आर. तथा अमित माळी यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे. हस्तलिखित अधिकार अभिलेख संगणकीकृत अधिकार अभिलेखाशी तंतोतंत जुळविण्यासाठी ई-फेरफार आज्ञावली, अद्ययावत डाटा मूळ हस्तलिखित अभिलेखाशी तंतोतंत जुळविण्यासाठी शासनाच्यावतीने एडिट व रिएडिट मोडून विकसित करण्यात आले होते. यामध्ये प्रामुख्याने महसूल अधिकार अभिलेखच्या नोंदवह्या तयार करणे व सुस्थितीत ठेवणे तसेच 7/12 व 8अ गावातील चावडी ही विशेष मोहीम हाती घेण्यात आली होती.

यात एकूण तीन टप्प्यात हा कार्यक्रम राबविण्यात आला होता. पहिल्या टप्प्यात सेतू केंद्र, महा-ई-सेवा केंद्र, आपले सरकार पोर्टल तसेच गाव कामगार तलाठी यांच्या माध्यमातून गावनिहाय खातेदारांनी आपले 7/12 प्राप्त करुन घेतले होते. त्यामध्ये काही आक्षेप आढळल्यास तलाठी अथवा तहसीलदार यांच्याकडे रितसर अर्ज करुन तक्रारी दाखल करण्याची संधी खातेदारांना देण्यात आली होती. दुसर्‍या टप्प्यात हे संगणकीकृत 7/12 उतारे चावडी वाचनाच्या माध्यमातून खातेदारांना पाहण्यासाठी उपलब्ध करण्यात आले होते.

काही चुका आढळल्यास संबंधित तलाठ्यामार्फत दुरुस्त करुन नव्याने 7/12 उतार्‍यांच्या प्रिंट खातेदारांना देण्यात आल्या होत्या. पहिल्या आणि दुसर्‍या टप्प्याच्या अनुषंगाने तिसर्‍या टप्पा राबविण्यात आला होता. यामध्ये तलाठी यांनी 100 टक्के, मंडल अधिकारी यांनी 30 टक्के, नायब तहसीलदार यांनी 10 टक्के, तहसीलदार यांनी 05 टक्के, उपविभागीय अधिकारी यांनी 03 टक्के, तर  धिकार्‍यांनी 01 टक्का पाहणी करुन हे अभिलेख बिनचूक बनविण्यासाठीची कार्यवाही पूर्ण करण्यात आली होती. यामध्ये मोहोळचे तहसीलदार बी.आर. तथा अमित माळी यांनी सर्व अधिकारी व 
कर्मचारी यांच्या मदतीने ही महत्त्वपूर्ण प्रक्रिया बिनचूक पूर्ण करुन घेतली होती. त्यामुळेचे मोहोळ तालुका हा या कामात सोलापूर जिल्ह्यातच नव्हे तर पुणे विभागात नंबर वन ठरला आहे. हे रिएडिटचे काम पूर्ण करण्यासाठी पुणे विभागीय आयुक्त चंद्रकांत दळवी, जमाबंदी आयुक्त एस. चोक्कलिंगम यांनी मोलाचे मार्गदर्शन केले होते.