Wed, Apr 24, 2019 16:17होमपेज › Solapur › पिंपळगावात आधुनिक पद्धतीने रोपनिर्मिती

पिंपळगावात आधुनिक पद्धतीने रोपनिर्मिती

Published On: Mar 24 2018 1:55AM | Last Updated: Mar 23 2018 10:52PMबार्शी : गणेश गोडसे 

आधुनिकतेची कास धरीत काही शेतकरी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शेतीसंबंधी सुधारणा करताना दिसून येत आहेत. पिंपळगाव  (ता. बार्शी)  येथील एका शेतकर्‍यानेही  असाच प्रयोग करून आंतरराष्ट्रीय पातळीवरील रोपनिर्मिती प्रक्रिया बार्शी तालुक्यातील ग्रामीण भागात राबवण्यास सुरूवात केली आहे. हा प्रयोग  शेतकर्‍यांसाठी एक वरदान ठरू पाहत  आहे.

अत्याधुनिक यंत्रसामुग्रीच्या सहाय्याने द्राक्ष वाणाची काडी व आपल्याला हवी असलेल्या उत्पादनाची काडी एकत्रित करून एकजीव करण्यात येते. प्रयोगशाळेत आवश्यक तापमानात त्या काडीला मुळी फुटते. त्यानंतर सात ते आठ दिवसांत रोप पूर्ण तयार होते. त्यामुळे पाहिजे त्या वाणाच्या कलमी रोपांची लागवड थेट शेतामध्ये करता येते.खूपच वेळखाऊ व प्रचलित प्रक्रियेतून कलम करणार्‍या असंख्य द्राक्ष उत्पादकांना आता उत्तम दर्जाचे कलम केलेले रोपच मिळणार आहे.  हे नवीन तंत्रज्ञान द्राक्ष शिवारात नुकतेच दाखल झाले असून त्यामुळे उत्पादन वेळेत मोठी बचत होणार आहे.

पिंपळगाव, ता. बार्शी येथील नितीन घावटे  यांनी हे एअर प्रुनिंग तंत्रज्ञान भारतात प्रथमच वापरले आहे. इस्त्रायल, दक्षिण आफ्रिका, न्यूझीलंड या देशांमध्ये हे तंत्रज्ञान मागील 25 वर्षांपासून वापरात असले तरी त्याचा शास्त्रशुद्ध अभ्यास करून नितीन घावटे यांनी त्यात भारतीय परिस्थितीनुसार काम केले आहे. या पद्धतीने सोलापूर भागातील काही शेतकर्‍यांनी यंदा लागवडही केली आहे.

प्रचलित पद्धतीतील समस्या
प्रचलित पद्धतीत जानेवारी, फेब्रुवारी महिन्यामध्ये  रुटस्टॉक रोपांची लागवड करण्यात येते. त्यानंतर ऑगस्ट, सप्टेंबर महिन्यात त्यावर कलम (ग्राफ्टिंग) केले जाते. यामध्ये पूर्ण वेलनिर्मिती होऊन उत्पादन सुरू होण्यास दोन वर्षांचा कालावधी लागतो. या नव्या पद्धतीत पूर्णपणे ग्राफ्ट (कलम) केलेले रोपच लागवड केले जात असल्यामुळे  पहिल्याच वर्षापासून उत्पादन सुरू होते. प्रारंभी ग्राफ्टेड रोपांची लागवड काही ठिकाणी होत असली तरी त्यासाठी रोपवाटिका करणार्‍यास आधी एक वर्षापासून तयारी करावी लागते. हा कालावधी आणि खर्चाचे प्रमाण अधिक आहे. त्यामुळे आधी रुटस्टॉक व नंतर सहा ते आठ महिन्यांनी ग्राफ्टिंग करण्याकडेच शेतकर्‍यांचा कल राहिला आहे.

प्रयोगशाळेचा वापर 
नूतन तंत्रज्ञानात ग्राफ्टिंगसाठी यंत्रांचा वापर होत असल्यामुळे ते खात्रीशीर एकजीव होऊन त्यांना लवकर मुळ्या फुटण्यासाठी प्रयोगशाळेत योग्य त्या तापमानाची सोय केली जाते. त्यानंतर ठराविक तापमान व आर्द्रता असलेल्या एका चेंबरमध्ये रुटस्टॉक आणि सायन एकजीव करण्याची प्रक्रिया केली जाते. तिला ‘कॅलसिंग’ असे म्हणतात. त्याचवेळी काडीच्या खालच्या बाजूला कोकोपीट असलेले प्लग लावले जातात. त्यामुळे तिथे मुळ्या फुटतात. ती मुळी पुढील 30 दिवसांत विकसित केली जाते. त्यानंतर पुढील आठ दिवस बाह्य वातावरणाची सवय करण्यासाठी प्रयत्न केले जातात. अशी 38 दिवसांत ग्राफ्टिंगची प्रक्रिया पूर्ण होऊन रोप लागवडीयोग्य होते. या प्रक्रियेत रुट आणि वाणाची काडी सर्व बाजूने एकरुप होते. 

सध्याच्या पद्धतीत नर्सरीच्या मातीतून गेलेले रोप लागवडीला दुसर्‍या मातीत जाते. यात नव्या मातीमुळे अडचणी येऊ शकतात. मात्र नव्या तंत्रज्ञानामध्ये मातीऐवजी निर्जंतुक केलेल्या कोकोपेटचा वापर केला जातो. त्यामुळे बुरशीचा प्रादुर्भावाचा न होता रोपाच्या मुळ्या कुठल्याही मातीला स्वीकारतात. नर्सरीतील रोपे   लागवड केलेल्या द्राक्षे बांगला देशात निर्यात झालेली आहेत. रोप शेतात आणल्यानंतर लागवडीसाठीच्या मजुरांची बचत होते, अशी माहिती नितीन घावटे यांनी दिली.
 

Tags : solapur, distric,t Pimpalgaon, village plant transplants,