Wed, May 22, 2019 14:27होमपेज › Solapur › दहावी कुमारभारती पुस्तकात चुका

दहावी कुमारभारती पुस्तकात चुका

Published On: May 07 2018 2:05AM | Last Updated: May 06 2018 8:21PMबार्शी  : तालुका प्रतिनिधी

दहावीच्या मराठी कुमारभारती (प्रथम भाषा) या पाठ्यपुस्तकात चुका झालेल्या असून त्या चुका व आक्षेप दुरुस्त करून आक्षेपाबाबत विचार करावा, अशी लेखी मागणी बार्शी येथील मराठी विषयाचे सेवानिवृत्त शिक्षक, मराठी विषयाचे समीक्षक बब्रुवाहन रामकृष्ण देशमुख यांनी महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळाचे संचालक (पुणे) यांच्याकडे केली आहे. कुमार भारतीच्या दहावीच्या पाठ्यपुस्तकात पाठ क्रमांक 3, पान क्रमांक 6 वर महेंद्र कदम यांच्या ‘कुटुंबांचं आगळ’ या धड्यात शेवटून चौथ्या ओळीत ‘तंबाटीनंतर शेंगा’ हा शब्द असण्याऐवजी तेथे ‘शेळ्या’ हा शब्द आलेला आहे. तसेच नंतर पान क्रमांक 24 वर रूपक कथेची सर्व आवश्यक अशी वैशिष्ट्ये देणे गरजेचे होते, मात्र ती देण्यात आलेली नाहीत.पुढे पान क्रमांक 46 वर गोष्टी, स्तंभ अनुक्रमांक 3 मध्ये ‘दुरभिमान’ असा शब्द आहे त्याऐवजी ‘दुराभिमान’ असे छापणे आवश्यक होते. पान क्रमांक 82 वर ‘पसायदान याचा अर्थ विनम्र मनाने परमेश्‍वराला हात जोडून केलेली विनंती’ असा देण्यात आला असून ‘पसायदान म्हणजे कृपाप्रसादाचे दान’ असा अर्थ सर्वश्रृत आहे. पान क्रमांक 116 वर संत हृदये चैत्र पाठातील शब्दार्थामध्ये हिररी शब्दाचा अर्थ आवेश, वेग, झपाटा असा आहे तो बरोबर आहे, तर 117 पानावर आवेश शब्दाचा अर्थ राग, संताप असा देण्यात आलेला आहे. आवेश म्हणजे भावनात्मक वेगाची वृत्ती व कृती असते.

पान क्रमांक 116 वर निष्कासित करणे याचा अर्थ निष्प्रभ करणे असाही होऊ शकतो. पान क्रमांक 115 वर इंटरप्रीटर दुभाषा असा अर्थ दिला आहे. येथे दुभाषी किंवा भाषांतरकार शब्द अर्थवाही ठरू शकतो. पान क्रमांक 116 वर समीक्षा संदर्भात विवेचनात फक्त पुस्तकाचीच समीक्षा वर्णिली आहे. समीक्षा लेख, पाठ, कविता इत्यादीची असू शकते. फक्त लेखक, त्यांची भाषाशैलीबाबत लिहिले आहे. लेखक व कवी अपेक्षित आहेत. बातमी लेखन पान क्रमांक 106 यात बातमीत बातमी अशी गोष्ट ज्यात मी नाही असे दिले आहे. असा अर्थ कोणत्या व्युत्पत्ती कोशात आहे, याचे स्पष्टीकरण दिले नाही, असे निवेदनात म्हटले आहे. मराठी भाषा अभ्यासगट सदस्यांनी निर्मितीच्या वेळी योग्य ती दक्षता घेण्यात यावी, अशी मागणीही देशमुख यांनी मंडळाकडे केलेली आहे. 

Tags : Solapur, Mistakes, 10, standard, book