Thu, Aug 22, 2019 08:33होमपेज › Solapur › अल्पवयीन मुलीवर बलात्कार; आरोपीस ७ वर्षे सक्‍तमजुरी

अल्पवयीन मुलीवर बलात्कार; आरोपीस ७ वर्षे सक्‍तमजुरी

Published On: Apr 12 2018 1:18AM | Last Updated: Apr 11 2018 10:34PMमाळशिरस : तालुका प्रतिनीधी 

अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी एका आरोपीस माळशिरसचे अप्पर जिल्हा सत्र न्यायाधीश आर. आर. पटारे यांनी 7 वर्षे सक्‍तमजुरी व 20 हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. जीवन बजरंग बोडरे (रा. वेळापूर, ता. माळशिरस) असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, सदर पीडित अल्पवयीन मुलगी वेळापूर येथे शिक्षण घेत होती. तिची शाळा सकाळी 11 ते  5.30 या वेळेत होती. दि 15 जानेवारी 2014 या दिवशी तिची शाळा दुपारी 1 . 30 वाजता सुटली. ही मुलगी दुपारी महादेव मंदिरातून दर्शन करून बाहेर आली असता आरोपी बोडरे हा मोटार सायकलवरून आला व तुला घरी सोडतो म्हणून घेऊन गेला. त्यानंतर मुलीच्या पालकांनी आरोपीच्या मामाकडे आरोपी बाबत चौकशी  केली असता मी शोध घेतो, असे सांगितले. परंतु, मुलीच्या पालकांनी दोन दिवस वाट पाहिली; परंतु आरोपी सापडला नाही. त्यानंतर पीडित मुलीच्या वडिलांनी  दि 18 जानेवारी 2014 ला आरोपी विरुद्ध वेळापूर पोलिसांत तक्रार दाखल केली.

पोलिसांनी पीडित मुलीकडे चौकशी केली असता आरोपीने ज्वारीच्या शेतात नेऊन बलात्कार केल्याचे सांगितले.त्यानंतर मुलीस चक्कर आली म्हणून  बळजबरीने खायला दिले. वेळापूर बसस्थानकावर आले असता  पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले. त्यानंतर पोलीसांनी तपास करुन आरोपीविरुद्ध माळशिरस सत्र न्यायालयात दोषारोप पत्र दाखल केले. या खटल्यात एकूण दहा साक्षीदार तपासण्यात आले. 

यापैकी पिडीत मुलगी, वडील, वैद्यकीय अधिकारी यांच्या साक्षी व न्याय वैद्यकीय प्रयोग शाळा पूणे यांचा अहवाल महत्वाचे ठरले. सरकार पक्षातर्फे दाखल करण्यात आलेले पुरावे व सरकारी वकील अ‍ॅड संग्राम पाटील व अ‍ॅड हसीना शेख यांनी केलेला युक्तीवाद ग्राह्य धरुन न्यायमुर्ती आर. आर. पटारे यांनी आरोपी जीवन बोडरे यास भा.दं.वि. कलम 366 (अ) 363 व बाल लैगीक अत्याचार प्रतिबंधक कायदा कलम 3 / 4 नुसार 7  वर्ष सक्तमजुरी व 20 हजार दंडाची शिक्षा सुनावली. या खटल्यात पैरवी म्हणुन आर. एस. सरवदे व महेश पोरे यांनी काम पाहीले.