Thu, Jul 18, 2019 12:16होमपेज › Solapur › अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार; पीडिता गर्भवती

अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार; पीडिता गर्भवती

Published On: Sep 03 2018 1:42AM | Last Updated: Sep 02 2018 10:00PMसोलापूर : प्रतिनिधी

ओळख वाढवून बाहेर फिरावयास नेऊन एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार केला. त्यानंतर इतर तिघा मित्रांनीही तिच्यावर सामूहिक बलात्कार केल्याप्रकरणी नितेश उबारे व इतर तिघांविरोधात (सर्व रा. साईबाबा चौक) जेलरोड पोलिस ठाण्यात पोस्कोसह भारतीय दंडविधानाच्या इतर कलमांन्वये गुन्हा दाखल झाला आहे. पीडिता पाच महिन्यांची गर्भवती असून, तिच्या पोटात दुखत असल्याने हा प्रकार उघडकीस आला. 

पद्मानगर येथे एका वाड्यात भाड्याने राहणार्‍या पीडित कुटुंबाच्या घरी कोणी नसल्याचा गैरफायदा घेऊन या चारही नराधमांनी तिच्यावर वेळोवेळी लैंगिक अत्याचार केला. पीडित मुलीची आई सकाळी दहा वाजता कामाला जाते आणि कोणी नसल्याचे पाहून पीडित 

मुलीस बाहेर फिरावयास चल म्हणून आरोपी नितेश उबारे याने बाहेर नेले. तिला फिरवून परत साईबाबा चौकातील घरी घेऊन गेला. तिने घरी सोडण्याचा हट्ट धरला, तरी त्याच्याही घरी कोणी नसल्याने तिच्यावर बळजबरी करून शरीर संबंध केले. त्यानंतर असे प्रकार वारंवार होत गेले. त्यानंतर नितेशने एके दिवशी तिघा मित्रांना घरी बोलावून त्यांनीही बळजबरीने सदर पीडितेशी शरीरसंबंध केले. कोणास सांगितले तर तुला आणि तुझ्या आईस जीवे ठार मारू, अशी धमकी दिली. पीडित मुलीला तिघांचा पूर्ण पत्ता, नाव माहित नसले तरी समोर आणल्यावर ओळखू शकते, असे तिने पोलिसांना सांगितले आहे. 

महिन्यापूर्वी पीडित मुलीच्या पोटात दुखू लागल्याने तिला विश्‍वासात घेऊन चौकशी केली असता तिने आपल्या आईस सर्व प्रकार सांगितला. ती पाच महिन्यांची गरोदर असल्याची धक्कादायक माहिती आईस समजली. त्यामुळे आईने पोलिसांकडे धाव घेऊन चौघांवर गुन्हा दाखल केला. अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक लेखाजी शिंदे करीत आहेत.