Sat, Apr 20, 2019 08:37होमपेज › Solapur › विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समिती अध्यक्षांना राज्यमंत्रिपदाचा दर्जा

विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समिती अध्यक्षांना राज्यमंत्रिपदाचा दर्जा

Published On: May 29 2018 10:51PM | Last Updated: May 29 2018 10:50PMपंढरपूर : प्रतिनिधी

श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीच्या अध्यक्षांना आता राज्यमंत्रिपदाचा दर्जा बहाल केला आहे. सोमवारी मुख्यमंत्र्यांनी यासंदर्भातील अध्यादेशाला मंजुरी दिली आहे. त्यामुळे  मंदिर समितीचे विद्यमान अध्यक्ष डॉ. अतुल भोसले यांना यापुढे लाल दिव्याची गाडी मिळणार असून विठ्ठल देवस्थानच्या अध्यक्षांचा रुबाब पहिल्यापेक्षा अधिक प्रमाणात वाढणार आहे. श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीचे यापूर्वीच विस्तारीकरण करण्यात आलेले आहे. पंढरपूर टेम्पल अ‍ॅक्टनुसार पहिल्यांदाच पूर्ण 11 सदस्यांची समिती नियुक्‍ती करण्यात आली आहे. त्यानंतर या कायद्यात सुधारणा करीत वारकरी संप्रदायातील एका व्यक्‍तीची मंदिर समितीच्या सहअध्यक्षपदी नियुक्‍तीची तरतूदही करण्यात आली आहे.

त्यानुसार ह.भ.प. गहिनीनाथ महाराज औसेकर यांची सहअध्यक्षपदी नियुक्‍ती केली आहे. एक महिन्यांपूर्वी समितीसाठी सल्लागार समिती नियुक्‍त केली असून त्यानुसार आता मंदिर समितीवर 27 सदस्यांची वर्णी लागली आहे. या पाठोपाठ आता मंदिर समितीच्या अध्यक्षांना राज्यमंत्रिपदाचा दर्जा बहाल करण्यात आला आहे. सोमवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यासंदर्भातील आदेशावर सही केली असून विद्यमान अध्यक्ष डॉ. अतुल भोसले यांना लाल दिव्याची गाडी दिमतीला मिळणार आहे. दरम्यान, या पदाचा मंदिर समितीला आणि देवस्थानच्या विकासाला लाभ होईल, अशी अपेक्षा बळावली असून या निर्णयाचे सर्व स्तरातून स्वागत होत आहे.