Mon, Mar 25, 2019 13:16होमपेज › Solapur › पालकमंत्री देशमुख दलितविरोधी

पालकमंत्री देशमुख दलितविरोधी

Published On: May 11 2018 12:46AM | Last Updated: May 11 2018 12:22AMसोलापूर : प्रतिनिधी

दलितांमध्ये मिसळून काम करा, या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या धोरणाला हरताळ फासण्याचे काम खुद्द जिल्ह्याचे पालकमंत्री विजयकुमार देशमुख हे करीत  असून ते दलितविरोधी आहेत, असा घणाघाती आरोप करीत बहुजन समाज पक्षाचे मनपातील गटनेते आनंद चंदनशिवे यांनी गुरुवारी आयोजित पत्रकार परिषदेत ना. देशमुख यांच्याविरोधात आंदोलन करण्याचा इशारा दिला. जिल्हा नियोजन मंडळाचे अध्यक्ष असलेल्या पालकमंत्र्यांनी गेल्या 9 महिन्यांपासून मंडळाची बैठक घेतली नाही. यामुळे शहर-जिल्ह्याचा विकास रखडला आहे. एवढेच नव्हे तर दलित वस्ती योजनांसंदर्भात लोकशाहीर अण्णा भाऊ साठे नागरी वस्ती सुधार योजनेचे अध्यक्ष असलेल्या पालकमंत्री हे या योजनेचे काम राबविण्यास तयार नाहीत. मराठा मोर्चाला उपस्थिती दर्शविणार्‍या ना. देशमुखांनी बहुजन क्रांती मोर्चाला जाणे टाळले. गत महिन्यात झालेल्या महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती समारोप मिरवणुकीत सहभाग टाळणेच पसंत केले. त्यांनी आजवर अस्थिविहार-भीमसृष्टीला भेट दिली नाही, अशी अनेक उदाहरणे ना. देशमुखांबाबत देता येतील, असे चंदनशिवे म्हणाले.

ना. देशमुख यांनी 119 कामे सूचविली. त्यापैकी 44 कामे हे दलित वस्तीशी संबंधित दाखविली; पण यापैकी एकही काम हे दलित वस्तीत नसल्याने तसेच अन्य कारणांवरून मनपाने रद्द केली आहेत. बुधवारी पालकमंत्री  यांच्यानजिकच्या नगरसेवकांनी भिडे गुरूजींची सभा सोलापुरात घेतली. यामुळे दलितांमध्ये भीतीदायक वातावरण निर्माण झाले आहे. कदाचित शहरात सामाजिक सलोखा बिघडवून जातीय दंगली भडकाविण्याचा पालकमंत्र्यांचा प्रयत्न असावा, असा आरोप चंदनशिवे यांनी केला.

शहरातील दलित वस्त्यांमध्ये अनेक मूलभूत समस्या आहेत. ज्या दलित वस्त्यांच्या मतांवर भाजपचे नगरसेवक निवडून आले त्या भागातही पालकमंत्र्यांनी अद्याप विकासकामे केली नाहीत. वास्ताविक दलित वस्ती संबंधित योजनांचे प्रस्ताव नगरसेवकांमार्फत जाणे अपेक्षित आहे, पण तसे होताना दिसत नाही. पालकमं त्री देशमुख यांना दलितांबद्दल कळवळा नाही. ते दुटप्पी वागतात. त्यांच्या या भूमिकेविरोधात दलित वस्त्यांबरोबरच शहरभरात सर्वत्र बसप सभा घेणार आहे. एवढेच नव्हे तर सर्वपक्षीय आंदोलनही उभारण्याचा विचार आहे, असे चंदनशिवे म्हणाले. पत्रकार परिषदेला नगरसेवक गणेश पुजारी, ज्योती बमगुंडे, स्वाती आवळे आदी उपस्थित होते.