Sun, Jul 21, 2019 09:54होमपेज › Solapur › यात्रेत जनावरांच्या बाजारात लाखोंची उलाढाल

यात्रेत जनावरांच्या बाजारात लाखोंची उलाढाल

Published On: Jan 20 2018 1:42AM | Last Updated: Jan 19 2018 10:07PMसोलापूर : प्रतिनिधी

गेल्या   नऊशे  वर्षांपासून सोलापुरात जनावरांचा बाजार भरवला जातो. दरवर्षी ग्रामदैवत सिद्धेश्‍वर महायात्रेत रेवणसिद्धेश्‍वर मंदिराजवळ मैदानात आंतर राज्यस्तरीय जनावरांचा बाजार फुलतो. तीन राज्यांतील म्हैशी, खिलार बैल जोडी व गायी विक्रीसाठी उपलब्ध असतात. सिद्धेश्‍वर महायात्रेप्रमाणेच जनावर बाजाराला नऊशे वर्षांची परंपरा  आहे. नऊशे वर्षे जुन्या बाजारात लाखोंची उलाढाल होते. 
महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, तेलंगणा व कर्नाटक या तीन राज्यांत प्रसिद्ध असे जनावर बाजारांचे आयोजन सोलापुरात केले जाते. सोलापुरात दरवर्षी जानेवारी महिन्याच्या 10  ते 20 पर्यंत   बाजार भरतो. मकर संक्रांतीवेळी सोलापूर शहरात सिद्धेश्‍वर यात्रा भरते. त्या यात्रेत नंदीध्वजांची मिरवणूक, अक्षता सोहळा व होमप्रदीपन असे मुख्य कार्यक्रम होतात. यातील एक मुख्य व वैशिष्ट्यपूर्ण म्हणजे जनावरांचा बाजार होय. 

1964  पर्यंत हा जनावर बाजार होम मैदान येथेच भरवला जात होता.परंतु त्याचठिकाणी गड्डा यात्रा भरते. मोठ्या प्रमाणात भाविक दर्शनासाठी सिद्धेश्‍वर मंदिरात येतात. गड्डा यात्रेत लोकदेखील  विरंगुळ्यासाठी व मनोरंजनासाठी येतात. वाढत्या लोकसंख्येच्या अनुषंगाने सोलापूर महानगरपालिकेने जनावर बाजार 1965 साली विजापूर-सोलापूर महामार्गावरील रेवणसिद्धेश्‍वर मंदिराच्या मैदानात हलविला. गड्डा यात्रेत जनावर बाजार असल्याने जनावर उधळून मोठी हानी टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला होता.

सात-आठ वर्षांपूर्वी येथील उत्कृष्ट जनावरांना बक्षिसे देण्यात येत होती. कालांतराने बक्षीस देण्याची ही प्रथा बंद करण्यात आली. सुमारे दीड कोटी रुपयांपर्यंतची उलाढाल येथील बाजारात होते. वेगवेगळ्या जातीच्या म्हशी या बाजाराचे वैशिष्ट्य आहे.जाफराबादी, मुर्‍हा, मैहसाणा, पंढरपुरी अशा वेगवेगळ्या उत्तम जातीच्या म्हशींना 50 ते 60 हजारांपर्यंत भाव येतो. खिलार बैलजोडी रुबाबदार व पाहण्यासारखी बाजारात दाखल होते. उष्ण कटिबंधीय क्षेत्रात टिकणारे शेतकी उपयोगी प्राणी म्हणजे खिलार गाय किंवा खिलार बैलाला ओळखले जाते. महाराष्ट्र, कर्नाटक व आंध्र प्रदेशातील शेतकरी  शेतीसाठी या खिलार बैलालाच अधिक पसंती देतात. सिद्धेश्‍वर महायात्रेच्या काळात रोजगाराच्यादेखील मोठ्या संधी उपलब्ध होतात. सिद्धेश्‍वर महायात्रेला  तीन राज्यांतून महत्त्व प्राप्त झाले आहे. जनावरांची मोठ्या प्रमाणात खरेदी-विक्री झाली.