होमपेज › Solapur › सर्व्हिस सेंटरला आग : लाखोंचे नुकसान

सर्व्हिस सेंटरला आग : लाखोंचे नुकसान

Published On: May 05 2018 11:23PM | Last Updated: May 05 2018 10:38PMसोलापूर : प्रतिनिधी

शहरातील होटगी रोडवरील औद्योगिक वसाहतीमध्ये असलेल्या चव्हाण मोटर्सच्या सर्व्हिस सेंटरला शनिवारी दुपारी अचानक आग लागून लाखो रुपयांचे नुकसान झाले. अग्‍निशामक दलाच्या जवानांनी 18 गाड्या पाणी व केमिकल मारून ही आग सुमारे तीन तासांनंतर आटोक्यात आणली. ही आग शॉर्टसर्किटने लागल्याची माहिती अग्‍निशामक दलाच्या वतीने सांगण्यात आली. या आगीमध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नसली तरी लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.

होटगी रोडवरील औद्योगिक वसाहतीमध्ये चव्हाण मोटर्सचे मारुती सुझुकी चारचाकी गाड्यांचे शोरूम आहे. या शोरूमच्या पाठीमागेच नव्याने सर्व्हिस सेंटर सुरू करण्याचे काम सुरू होते. सर्व्हिस सेंटरचे काम अंतिम टप्प्यात आले असून लवकरच या  सर्व्हिस  सेंटरचे उद्घाटन होणार होते. सर्व्हिस सेंटरमध्ये लाईटच्या फिटिंगचे काम सुरू होते.
परंतु, शनिवारी दुपारी बाराच्या सुमारास चव्हाण मोटर्सच्या सर्व्हिस सेंटरमधील माळ्यावर असलेल्या साहित्याला आग लागल्याचे दिसून आले.  सर्व्हिस सेंटरमधील कर्मचार्‍यांना ही आग दिसून आल्यानंतर त्यांनी धावत शोरूममध्ये जाऊन याबाबतची माहिती दिली. तोपर्यंत आगीने रौद्ररूप धारण केले होते. याची माहिती मिळताच अग्‍निशामक दलाचे प्रमुख केदार आवटे व त्यांच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेऊन आग विझविण्यासाठी पाण्याचा मारा सुरू केला. परंतु, आगीचे लोट मोठे होते. धुराने परिसर 
काळोखला होता.

त्यामुळे आगीवर नियत्रंण मिळविताना अग्निशामक दलाच्या जवानांना मोठा त्रास सहन करावा लागला. सर्व्हिस सेंटरमधील माळ्यावर चारचाकी वाहनांचे   नवीन सीट कव्हर, स्पेअरपार्ट, त्याला असलेले प्लास्टिक कव्हर, कलरचे डबे यामुळे आग भडकतच होती.  आकाशात मोठे धुरांचे लोट दिसू लागल्याने याठिकाणी बघ्यांची मोठी गर्दी झाली होती. यावेळी पोलिसांनी सौम्य लाठीमार करुन बघ्यांना पांगविले व त्यानंतर आगा आटोक्यात आली. अग्निशामक दलाच्या जवानांनी सुमारे 18 गाड्या पाण्याचा मारा तसेच केमिकलचा मारा करुन ही आग सुमारे 3 तासांनंतर आटोक्यात आणली. 

चव्हाण मोटार्सचे मालक बाबू चव्हाण व घनशाम चव्हाण हे परदेशात असल्यामुळे या आगीमध्ये नेमके कितीचे नुकसान झाले याबाबत नेमकी माहिती मिळू शकली नाही. आगीमध्ये झालेल्या नुकसानीचा पंचनामा करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरु होते.