Mon, Nov 19, 2018 14:46होमपेज › Solapur › सहकारमंत्र्यांच्या घरासमोर दूध ओतून आंदोलन

सहकारमंत्र्यांच्या घरासमोर दूध ओतून आंदोलन

Published On: Jul 17 2018 1:40AM | Last Updated: Jul 17 2018 1:40AMसोलापूर : प्रतिनिधी

दूध आंदोलनाच्या पार्श्‍वभूमीवर अखिल भारतीय किसान सभेच्या कार्यकर्त्यांनी सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्या घरासमोर दुधाचे कॅन ओतून दुग्धविकासमंत्री महादेव जानकर व सहकारमंत्र्यांचा निषेध व्यक्‍त केला. विजापूर नाका पोलिसांनी ताबडतोब आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेऊन गुन्हा दाखल केला आहे. दुधाला योग्य भाव मिळावा किंवा प्रतिलिटर मागे 5 रुपये अनुदान देण्यात यावे या प्रमुख मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने 15 जुलैच्या मध्यरात्रीपासून दूध पुरवठा बंद केला आहे. सोलापूर शहर व राज्यभरातील दूध विके्रत्यांनी व शेतकर्‍यांनी या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. मोठ्या शहरांना जाणार्‍या टँकर रोखण्याचा प्रयत्नदेखील सुरु आहे. सोलापूर शहरातील अनेक शेतकर्‍यांनी सोमवारी जिल्हा दूध संघाला दूध दिले नाही.

जिल्हा दूध संघ शेतकरी व व्यापार्‍यांकडून 16 ते 17 रुपये प्रति लिटर याप्रमाणे दूध विकत घेतात.स्वाभिमानी शेतकरी संघाने या दराला विरोध करत 25 ते 27 रुपये या दराने प्रति लिटर दूध विकत घ्यावे ही प्रमुख मागणी करत दूध आंदोलनाची सुरुवात सोमवारपासून केली आहे. अखिल भारतीय किसान सभेचे  डॉ. शिवानंद झळके यांच्या नेतृत्वाखाली सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्या होटगी रोड येथील निवासस्थानासमोर सुमारे 200 लिटर दूध ओतून दुग्धविकासमंत्री महादेव जानकर व सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्याविरोधात घोषणाबाजी केली. विजापूर नाका पोलिस ठाणे अंकित औद्योगिक पोलिस चौकीतील पोलिसांनी ताबडतोब आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेतले. यामध्ये रोहित हजारे, राजू टेळे, चांद कोरबू, महमंद शेख, आकाश साठे, जावेद आवटे, संतोष साठे यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.