Tue, Jul 16, 2019 11:36होमपेज › Solapur › आजपासून जनावरांसह चक्‍काजाम

आजपासून जनावरांसह चक्‍काजाम

Published On: Jul 19 2018 1:39AM | Last Updated: Jul 18 2018 10:39PMसोलापूर : प्रतिनिधी

सोलापूरसह राज्यात दूध आंदोलन चांगलेच पेटले असून गुरुवारपासून रस्त्यावर जनावरे आणून चक्‍काजाम आंदोलन करणार असल्याची माहिती स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकार्‍यांनी दिली. सोलापुरातील कंदलगाव, वाखरी, माढा आदी गावांना लागून असलेल्या मुख्य रस्त्यांवर व चौकांत हे आंदोलन केले जाणार आहे.

गेल्या तीन दिवसांपासून दूध संकलन बंद झाले असून शिल्लक असलेले व साठवणूक केेलेल्या दुधाचे साठे आता संपत आले आहेत. 16 जुलैपासून राज्यभरात दूध आंदोलन सुरू झाले आहे. दुधाला प्रतिलिटर 5 रुपये अनुदान देण्यात यावे, अशी प्रमुख मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने केली आहे किंवा प्रतिलिटर 25 ते 27  रुपये भाव देण्यात यावा, 

असे शेतकर्‍यांचे म्हणणे आहे. बुधवारी सकाळी मोहोळ तालुक्यात वटवटे येथील गावात संघटनेच्यावतीने जवळपास 500 लिटर दूध रस्त्यावर ओतण्यात आले. खासगी दुधवाले ग्रामीण भागातील शेतकर्‍यांकडून चोरुन दूध घेऊन जाताना आंदोलकांनी पकडले व त्यांच्या ताब्यातील दूध फेकून दिले. यावेळी सुरेश पाटील, कोंडीबा मडके, विनायक व्हनमाने, अण्णा सरपळे, सुभाष सरपळे, उत्तम गायकवाड, संतोष वाघमारे, गंगाराम वाघमोडे, दगडू गायकवाड, राजू बंडगर आदी उपस्थित होते. महाराष्ट्र-कर्नाटक सीमावर्ती भागातून खासगी व्यापारी कॅनमधून दूध घेऊन येताना स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी पकडून दूध फेकून दिले. त्यावेळी बिळ्यानी सुंटे यांना मंद्रुप पोलिसांनी ताब्यात घेऊन नोटीस दिली व सोडून दिले.

तुंगत येथे किरकोळ दगडफेक

पंढरपूर तालुक्यातील तुंगत गावात मंगळवारी रात्री शिवामृत दुधाच्या टँकरवर किरकोळ दगडफेक करुन परत पाठविण्यात आले. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष समाधान खाटे यांनी दिलेल्या माहितीनुसार एकीकडे राष्ट्रवादी काँग्रेस या आंदोलनास पाठिंबा देते, तर दुसरीकडे त्यांचे नेते टँकर दूध वाहतूक करतात. पंढरपुरातील प्रशांत परिचारकांचे दूध संकलन केंद्र बंद पाडण्यात आले. आपल्या कुटुंबियांसोबत जनावरे घेऊन रस्त्यावर येऊन चक्काजाम करणार असल्याची माहिती समाधान खाटे यांनी दिली. तुंगत येथील आंदोलनात तानाजी बागल, नवनाथ माने, विजय रणदिवे, गोपाळ घाडगे, कीर्ती गायकवाड, नवनाथ बागल आदी कार्यकर्त्यांनी प्रमुख भूमिका बजावली.

वाखरी येथे जनावरे व कुटुंबियांसह रस्त्यावर उतरणार

पंढरपूर तालुक्यातील वाखरी याठिकाणी आपल्या घरातील सर्व सदस्य व जनावरे घेऊन रस्त्यावर उतरणार असल्याची माहिती स्वाभिमानी संघटनेचे समाधान खाटे व जिल्हा संघटक विजय रणदिवे यांनी सांगितली. मंगळवारी दुधाची वाहतूक करणार्‍या टँकरमधून व खासगी व्यापार्‍यांकडून दुधाचे कॅन ताब्यात घेऊन तालुक्यातील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना वाटप करण्यात आले. शहर व जिल्ह्याभरात दुधाचे संकलन ठप्प झाले असून शहरात वितरित होणारा दूधसाठा संपत आला आहे. याची झळ आजपासून सोसावी लागणार आहे.