Sun, Jul 21, 2019 10:46होमपेज › Solapur › सभासद नोंदणी झाली, कर्ज वाटपाचे काय ?

सभासद नोंदणी झाली, कर्ज वाटपाचे काय ?

Published On: Jan 20 2018 1:42AM | Last Updated: Jan 19 2018 10:04PMसोलापूर : महेश पांढरे  

सोलापूर जिल्ह्यात सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी विकास कार्यकारी सोसायट्यांना नव्याने सभासद करून घ्यावे यासाठी अभियान राबविले होते. त्या माध्यमातून जवळपास 40 हजार शेतकर्‍यांना नव्याने सभासदत्व देण्यात आले आहे. मात्र त्यापैकी एकाही नव्या सभासदाला अद्याप एक रुपयाचेही कर्ज वाटप करण्यात आलेले नाही. त्यामुळे सभासदत्व दिले, आता कर्ज कोण देणार, असा सवाल या सभासदांनी उपस्थित केला आहे.

जिल्ह्यातील विकास कार्यकारी सोसायट्यांमध्ये राजकारण होत असून यामुळे पात्र लाभार्थी शेतकर्‍यांना सभासदत्व दिले जात नव्हते. त्यामुळे पात्र असूनही अशा शेतकर्‍यांना कर्ज वाटप होत नव्हते. त्यामुळे या स्थानिक राजकारणाला कंटाळलेल्या शेतकर्‍यांना सभासदत्व मिळावे यासाठी राज्याचे सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी खास अभियान घेऊन राज्यभरात शेतकर्‍यांना विकास कार्यकारी सोसायटीचे सभासद करुन घेण्याचे आवाहन केले होते. त्यानुसार जिल्हा उपनिबंधक कार्यालयाच्यावतीने जिल्ह्यातील विविध तालुक्यांत जवळपास पाचशेच्यावर मेळावे घेऊन ही सभासद नोंदणी करण्यात आली. या माध्यमातून सोलापूर जिल्ह्यात 36 हजारांवर शेतकर्‍यांना नव्याने सभासद करून घेण्यात आले. मात्र त्यानंतर या शेतकर्‍यांकडे पूर्णपणे दुर्लक्ष करण्यात आले आहे. त्यामुळे नव्याने सभासद झालेल्या एकाही शेतकर्‍याला नव्याने कर्ज वाटप करण्यात आलेले नाही. त्यामुळे मग सभासदत्वच का दिले, असा सवाल आता नव्याने सभासद झालेल्या शेतकर्‍यांनी उपस्थित केला आहे. नुकतीच शासनाने कर्जमाफी दिली असून यामध्येही जुन्याच सभासदांना लाभ मिळत आहे. त्यामुळे नव्याने सभासदांना कर्जही नाही आणि शासनाचा लाभही नाही, अशी अवस्था शेतकर्‍यांची झाली आहे. त्यामुळे नव्याने सभासद करून घेतलेल्या शेतकर्‍यांना तातडीने कर्ज वाटप करावे, अशी मागणी होत आहे.