Mon, Jun 24, 2019 16:52होमपेज › Solapur › सदस्याचे गैरवर्तन; मंदिर समितीची बदनामी

सदस्याचे गैरवर्तन; मंदिर समितीची बदनामी

Published On: Sep 03 2018 1:42AM | Last Updated: Sep 02 2018 9:46PMपंढरपूर : प्रतिनिधी

श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीचे सदस्य सचिन अधटराव यांच्याविरोधात पंढरपूर शहर पोलिसांत विठ्ठल दर्शनाचा काळाबाजार केल्याप्रकरणी फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. मंदिर समितीच्या  सदस्याविरोधात पोलिसांत गुन्हा दाखल होण्याची ही पहिलीच वेळ असून सचिन अधटराव हे नियुक्तीच्या पहिल्या दिवसापासून वादाच्या केंद्रस्थानी राहिलेले आहेत. त्यांच्या सततच्या गैरवर्तनाबद्दल विठ्ठल देवस्थानची राज्यभरात बदनामी झालेली आहे. त्यामुळे वारकरी संप्रदायाकडून अधटराव यांच्यावर कारवाई  करण्याची मागणी होत आहे. 

श्री विठ्ठल-रुक्मिणीच्या दर्शनासाठी परराज्यातून आलेल्या दोन भाविकांकडून 800 रूपये घेतल्याची आणि फसवणूक झाल्याची तक्रार शहर पोलिसांत दाखल झाली आहे. या फसवणूक प्रकरणाचा तपास करीत असताना या फसवणुकीतील सूत्रधार मंदिर समिती सदस्य सचिन अधटराव असल्याचे समोर आले आहे. त्यानंतर शहर पोलिसांनी त्यांच्याविरोधात पोलिसांत गुन्हा दाखल करून अधटराव यांना अटकही केलेली आहे. 

मंदिर समितीच्या सुमारे 3 दशकांच्या कार्यकाळात पहिल्यांदाच एखाद्या सदस्याविरोधात पोलिसांत गुन्हा दाखल झाला असून त्यामाध्यमातून मंदिर समितीचीही मोठीच बदनामी झालेली आहे. 

सचिन अधटराव यांची नियुक्ती पंढरपूर  शहरासह वारकरी संप्रदायालाही अनपेक्षित होती. शिवसेनेच्या कोट्यातून शिवसैनिक असलेल्या अधटराव यांची नियुक्ती वरिष्ठ पातळीवरूनच झाली असल्यामुळे ही नियुक्ती होईपर्यंत यासंदर्भात कुणालाही कसलीही कल्पना नव्हती. त्यामुळे जेव्हा सचिन अधटराव यांचे नाव सदस्य यादीत दिसले, तेव्हा सर्वांच्याच भुवया उंचावल्या गेल्या. समिती सदस्य म्हणून चांगले काम करण्याची संधी असतानाही सचिन अधटराव पहिल्या दिवसापासून सतत वादाच्या केंद्रस्थानी राहिलेले आहेत. भाविकांकडून पैसे घेऊन दर्शनासाठी सोडल्याचा गंभीर आरोप यापूर्वी त्यांच्यावर अनेकवेळा झालेला आहे. 

समितीच्या कर्मचार्‍यांसोबत आक्षेपार्ह वर्तन केल्यामुळे आषाढी यात्रेच्या तोंडावरच कर्मचार्‍यांनी आंदोलन केलेले होते. त्यावेळी अधटराव यांनी कर्मचार्‍यांची माफी मागितल्यामुळे त्या वादावर पडदा पडला होता. तर दुसर्‍या बाजूला श्री विठ्ठलाचा लाडू प्रसाद करणार्‍या ठेकेदाराकडे खंडणी मागितल्याचेही प्रकरण आषाढी यात्रेच्या तोंडावर समोर आले होते. या सर्व प्रकारातून मंदिर समिती प्रशासनाने अधटराव यांच्याकडे दुर्लक्ष केले. कोणत्याही प्रकारची कारवाई केली गेली नाही.

त्यामुळे वरचेवर सचिन अधटराव यांचे गैरवर्तन वाढत गेल्याचे मंदिर परिसरात बोलले जात आहे. या सर्वांचा कडेलोट होऊन दोन भाविकांनी पोलिसांत दिलेल्या फिर्यादीनंतर मंदिर परिसरात पैसे घेऊन दर्शन घडवणार्‍या दोन एजंटांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे आणि त्यांच्याकडील चौकशीत सचिन अधटराव यांचे नाव निष्पन्न झाले आहे. अधटराव यांच्या अशाच गैरवर्तनामुळे मागील वर्षभरात मंदिर समितीची प्रचंड बदनामी झालेली आहे. त्यामुळे त्यांना समितीतून बडतर्फ करण्यात यावे, अशी मागणी सामान्य वारकर्‍यांतून होऊ लागली आहे. विधी व न्याय विभाग याबाबत काय भूमिका घेतो, मंदिर समितीचे अध्यक्ष डॉ. अतुल भोसले काय कारवाई करतात, याकडे आता वारकरी संप्रदायाचे लक्ष लागले आहे.