Tue, Jul 14, 2020 00:47होमपेज › Solapur › पवार कामाला लागले; शनिवारी सोलापुरातील नेत्यांची बैठक!

पवार कामाला लागले; शनिवारी सोलापुरातील नेत्यांची बैठक!

Published On: Jun 13 2019 1:37AM | Last Updated: Jun 12 2019 11:10PM
सोलापूर : विशेष प्रतिनिधी

लोकसभा निवडणुकीत झालेली वाताहत पाहता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आगामी विधानसभा निवडणुकीसाठी रणनीती आखण्यासाठी बैठकांचे सत्र लावले असून विधानसभा निवडणुकीत भाकरी फिरविण्याची शक्यता वर्तविली जात आहे. त्यासाठी येत्या 15 जून रोजी सोलापूर जिल्ह्यातील नेत्यांची मुंबईत बैठक आयोजित करण्यात आली आहे. जिल्ह्यातील चार मतदारसंघांत सध्या राष्ट्रवादीचे आमदार आहेत. हे मतदारसंघ पक्षाकडे कायम राखण्यासाठी पवारांना चांगलीच राजकीय कसरत करावी लागणार आहे. 

लोकसभा निवडणुकीत सोलापूर व माढा मतदारसंघांत काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसला पराभव बघावा लागला आहे. माढ्यासारख्या बालेकिल्ल्यात मोहिते-पाटलांनी ‘कमळ’ हाती घेतल्याने हा बालेकिल्ला पवारांच्या हातातून गेला आहे. सध्या माढा, माळशिरस, मोहोळ, बार्शी या मतदारसंघांत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आहेत. माळशिरस मतदारसंघातील बदललेली राजकीय समिकरणे पाहता हा मतदारसंघ पक्षाकडे ठेवण्याची मोठी कसरत पवारांना करावी लागणार आहे. स्व. हनुमंत डोळस यांच्या निधनानंतर तेथे उमेदवार देताना पवारांना राजकीय समिकरणेही जुळवावी लागणार आहेत. दुसरीकडे मोहोळ मतदारसंघातील आमदार रमेश कदम हे सध्या कारागृहात आहेत. आगामी विधानसभेची निवडणूक आपण मोहोळमधून लढविणार नसून जालना जिल्ह्यातील बदनापूर मतदारसंघातून विधानसभा लढवू व त्यासाठी पक्षही लवकरच निश्‍चित करू, अशी माहिती आ. कदम यांनी दै.‘पुढारी’ला दिली आहे. त्यामुळे मोहोळमध्ये उमेदवार कोण, हा प्रश्‍नही पवारांपुढे आहे. माढा व बार्शी मतदारसंघांतील विद्यमान आमदार कायम राहण्याची शक्यता असली तरी माढ्यात पवार भाकरी फिरविण्याच्या मूडमध्ये असल्याची माहिती त्यांच्याच पक्षातील वरिष्ठ नेते देत आहेत. याशिवाय सोलापूर दक्षिण, सोलापूर उत्तर, करमाळा या भाजप-शिवसेनेच्या ताब्यातील मतदारसंघांवरही पवारांचे लक्ष आहे. करमाळ्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराचा गतवेळेस मतविभाजनामुळे पराभव झाला होता. यावेळेस हे मतविभाजन टाळण्यासाठी पवार प्रयत्नपूर्वक नियोजन करत आहेत. रश्मी बागल की संजय शिंदे यापैकी एकाला उमेदवारी देण्याची शक्यता पाहता संबंधित राजकीय समिकरणे व इतर राजकीय बाबींचाही पवारांना विचार करावा लागणार आहे. 

राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने शरद पवारांनी 13, 14, 15, 21 आणि 23 जून रोजी मुंबईत बैठका आयोजित केल्या असून या बैठकांना संबंधित जिल्ह्यातील नेत्यांना पाचारण केले आहे. या बैठकीत संबंधित मतदारसंघातील सध्याची राजकीय परिस्थिती, संभाव्य उमेदवारांची नावे, पक्षाची स्थिती व अपेक्षित बदलांबाबत स्थानिक नेत्यांकडून सविस्तर अहवाल घेतला जाणार आहे. सोलापूर जिल्ह्यातील नेत्यांची 15 जून रोजी बैठक बोलावण्यात आली आहे. या बैठकीत पक्षाचा जिल्हाध्यक्ष बदल, माढा, करमाळा, सोलापूर शहर उत्तर, माळशिरस, मोहाळ या मतदारसंघांबाबत चर्चा केली जाणार आहे. 

माढा लोकसभा मतदारसंघातील पक्षाच्या पराभवानंतर माढा, माळशिरस, करमाळा या विधानसभा मतदारसंघांतील राजकीय समिकरणे पूर्णपणे बदलून गेली आहेत. त्यामुळे या मतदारसंघात नवीन नेतृत्वाला संधी देण्याची शक्यता वर्तविली जात आहे. त्यादृष्टीने भाकरी फिरविण्याचे संकेत पवारांनी दिली असले तरी पवार नेमके काय करणार, याचा अंदाज अद्याप कुणालाही आलेला नाही.

जयसिंह मोहिते-पाटील यांनी तांत्रिकद‍ृष्ट्या राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष अद्याप सोडलेला नाही. दुसरीकडे विजयदादा मोहिते सोडले तर त्यांचा संपूर्ण गट हा भाजपात गेला आहे. रणजितसिंह मोहिते-पाटील व त्यांच्या गटाने दिलेल्या लाखाच्या लीडमुळेच माढ्यात राष्ट्रवादीचे उमेदवार संजय शिंदे यांचा पराभव होऊ शकला. त्यामुळे माढा लोकसभा मतदारसंघातील विधानसभा मतदारसंघांतही भाजपने राष्ट्रवादीसाठी जोरदार चक्रव्यूह रचलेला आहे. राज्याचे महसूलमंत्री चंद्रकांतदादा पाटील व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्वतः या भागात लक्ष ठेवून आहेत. 

चंद्रकांतदादा व मुख्यमंत्र्यांच्या राजकीय रणनीतीला काटशह देण्यासाठी शरद पवारांनी या भागातील राजकीय गणिते नव्याने आखण्याचा निर्णय घेतला असल्याचे पक्षाच्या वरिष्ठस्तरीय सूत्रांचे म्हणणे आहे. त्यासंदर्भातील चर्चा 15 जूनच्या बैठकीत अपेक्षित आहे, असेही या नेतृत्वाने सांगितले. मुंबईतील बैठकीला शरद पवार यांच्यासह पक्षाचे ज्येष्ठ नेते तथा प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, प्रफुल्ल पटेल, छगन भुजबळ व अजित पवार हेदेखील उपस्थित राहणार आहेत. 

या बैठकीला पक्षाने आजी-माजी आमदार, माजी खासदार, जिल्हाध्यक्ष, स्थानिक पदाधिकारी यांना निमंत्रित केले असून त्यांना सविस्तर अहवाल घेऊन येण्यास सांगितले आहे. 2014 च्या विधानसभा निवडणुकीत स्वतंत्र लढलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसने रश्मी बागल (करमाळा), बबनराव शिंदे (माढा), दिलीप सोपल (बार्शी), रमेश कदम (मोहोळ), महेश गादेेकर (सोलापूर उत्तर), विद्या लोळगे (सोलापूर मध्य), दिलीपभाऊ केरबा सिद्धे (अक्‍कलकोट), बाळासाहेब शेळके (सोलापूर दक्षिण), चंद्रकांत बागल (पंढरपूर), हणुमंत डोळस (माळशिरस) यांना उमेदवारी दिली होती. त्यात माढा, बार्शी, मोहोळ, माळशिरस या चार मतदारसंघांत पक्षाचे उमेदवार विजयी झाले होते. तर सोलापूर मध्य, अक्‍कलकोट, पंढरपूर-मंगळवेढा येथे काँग्रेस, सोलापूर दक्षिण, सोलापूर उत्तर भाजप व करमाळा मतदारसंघात शिवसेनेचा आणि सांगोल्यात ‘शेकाप’चा उमेदवार विजयी झाला होता. आता काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडी होण्याची शक्यता गृहीत धरता पवारांना स्थानिक राजकीय समिकरणे लक्षात घेऊन उमेदवारांची निवड करावी लागणार आहे, असेही पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्वाने सांगितले आहे.

सोलापूरला एक तास मिळणार
15 जून रोजी मुंबईत सोलापूर जिल्ह्याच्या होणार्‍या आढावा बैठकीसाठी शरद पवारांकडून एक तासाचा अवधी दिली असून इतरही जिल्ह्यांना एक तास दिला जाणार आहे. एका तासात जिल्ह्यातील राजकीय समिकरणाचा आढावा शरद पवार घेणार आहेत.

सोलापूरसाठी एक तास देणार!
15 जून रोजी मुंबईत सोलापूर जिल्ह्याच्या होणार्‍या आढावा बैठकीसाठी शरद पवारांकडून एक तासाचा अवधी दिला जाणार आहे. यादिवशी इतरही जिल्ह्यांना पवारांनी वेळ दिला आहे. नगरसेवक, तालुका पदाधिकारी, आजी-माजी आमदार, प्रमुख नेते यांना या बैठकीसाठी पाचारण करण्यात आलेले आहे. तासाभराच्या वेळात जिल्ह्यातील राजकीय समिकरणाचा आढावा शरद पवार घेणार आहेत. आपले जिल्हाध्यक्ष पद बदलले जाण्याची निव्वळ अफवा आहे. 

दीपकआबा साळुंखे-पाटील, जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस.