होमपेज › Solapur › उजनीतून भीमा नदीला रविवारी पाणी सुटणार?

उजनीतून भीमा नदीला रविवारी पाणी सुटणार?

Published On: May 21 2018 11:14PM | Last Updated: May 21 2018 11:02PMपंढरपूर : प्रतिनिधी

अधिक मासानिमित्त भाविकांची होत असलेली गर्दी लक्षात घेऊन, तसेच पंढरपूर, सांगोला, मंगळवेढा शहरांसह शिराभावी पाणीपुरवठा योजनेसाठी उजनी धरणातून भीमा नदीला 27 मे रोजी पाणी सोडण्यात येणार असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात येते.  गेल्या महिन्याभरापासून भीमा नदीवरील सर्व बंधारे  मोकळे   झाल्यामुळे नदीकाठची पिके पाण्याअभावी संकटात आलेली आहेत. त्याचबरोबर पंढरपूर, सांगोला, शिरभावी पाणी  पुरवठा योजनेच्या पंढरपूर येथील बंधार्‍यातील पाणी पातळी प्रचंड खालावली आहे. गेल्या आठ दिवसांपासून पंढरपूर शहरात एक दिवसाड पाणी पुरवठा सुरू झालेला आहे. गोपाळपूर येथील बंधार्‍यातील पाणीपातळी खालावल्यामुळे चंद्रभागेत अतिशय कमी पाणीसाठा राहिलेला आहे. अधिक मासानिमित्त पंढरपुरात येणार्‍या भाविकांची दैनंदीन संख्या 1 लाखावर पोहोचली असून या अतिरिक्‍त लोकसंख्येचा ताणही पंढरपूर शहराच्या पाणी पुरवठा यंत्रणेवर येत आहे. 

भाविकांच्या पिण्याच्या आणि स्नानाच्या पाण्याची गरज तसेच पंढरपूर, सांगोला, मंगळवेढा शहरांसह शिरभावी पाणी पुरवठा योजनेसाठी उजनी धरणातून भीमा नदीलला पाणी सोडण्याचा निर्णय घेतला जाणार आहे. सोलापूर महानगरपालिकेने अद्याप जरी पाणी सोडण्याची मागणी केली नसली तरीही गरज लक्षात घेऊन  उजनी धरणातून पाणी सोडण्याचा पाटबंधारे विभागाने निर्णय घेतल्याचे समजते.