Fri, Apr 26, 2019 09:31होमपेज › Solapur › ‘त्या’ माकडिणीला कॅन्सरची शक्यता !

‘त्या’ माकडिणीला कॅन्सरची शक्यता !

Published On: May 26 2018 12:20AM | Last Updated: May 26 2018 12:04AMसोलापूर :  प्रतिनिधी

ती माकडीण गर्भवती नसल्याचा  पुरावा डॉक्टरांनी सोनोग्राफीमधून दिला आहे. परंतु पोट फुगण्याचे कारण पाहताना त्या माकडिणीच्या गर्भ पिशवीत जीवघेणी गाठ असल्याचे निष्पन्न झाले आहे. कॅन्सर (कर्करोग) असण्याची शक्यता डॉक्टरांनी व्यक्त केली आहे. शनिवारी हैदराबाद रोडवर  गरोदर माकडीण प्राणीप्रेमींना  आढळली होती. निसार व सुनील या प्राणीप्रेमींनी राहत अ‍ॅनिमलच्या डॉक्टरांना कळविले. तिच्या पार्श्‍वभागातून रक्तस्त्राव होत होता.वनविभागाच्या कर्मचार्‍यांनी महात्मा गांधी प्राणीसंग्रहालयात पाठवून तिची तपासणी करुन ती गरोदर असल्याची खात्री करुन घेतली. सुरुवातीला प्राणीसंग्रहालयातील अधिकार्‍यांनी तिला प्राणीसंग्रहालयात ठेवून घेण्यास नकार दिला. वन विभागाचे निकेतन जाधव यांनी स्वत:च्या घराजवळ ठेवले. तिची सोनोग्राफी केली.

त्यामध्ये ती गर्भवती नसल्याचा खुलासा झाला. परंतु पोट एवढे फुगले होते की बघणारा व्यक्ती गर्भवती असल्याचा अंदाज लावत होता. दोन दिवसांनंतर त्या माकडिणीला  प्राणीसंग्रहालयात आश्रय मिळाला. तिच्यावर उपचार सुरु आहेत. परंतु डॉक्टरांनी तिच्या पुढील तपासण्या सुरु केल्या आहेत. गर्भ पिशवीत गाठ व पू असल्याचे निदर्शनास आले आहे. पार्श्‍वभागातून सतत पू व रक्तस्त्राव होत आहे. अँटिबायोटिकसह औषधोपचार करण्यात येत आहेत. माकडिणीला होत असलेल्या वेदनांमुळे नागरिकांमधून हळहळ व्यक्त होत आहे.