Tue, Jun 25, 2019 21:26होमपेज › Solapur › अत्याचारांच्या निषेधार्थ मातंग समाजाचा मोर्चा

अत्याचारांच्या निषेधार्थ मातंग समाजाचा मोर्चा

Published On: Jul 05 2018 1:41AM | Last Updated: Jul 04 2018 9:09PMसोलापूर : प्रतिनिधी

मातंग समजावर अनेक ठिकाणी अन्याय, अत्याचार होत आहेत तसेच अनेक मागण्या वर्षानुवर्षे प्रलंबित आहेत. त्याचा शासन गांभीर्याने विचार करत नाही याच्या निषेधात मातंग समजाच्यावतीने काढण्यात आलेल्या मोर्चात अनेक नेत्यांनी शासनावर हल्लाबोल करत या जुल्मी शासनाला जाब विचारण्यासाठी सज्ज राहा, असे आवाहन केले.

यावेळी भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी घटनेत दिलेल्या अधिकाराचा हक्क मिळविण्यासाठी आता समाजाने सत्ताधारी व्हायला हवे, असे आवाहन केले. यापुढे लोकांपुढे हात पसरण्यापेक्षा हक्क खेचून घ्या, असे आवाहन केले. यावेळी माजी मंत्री उत्तमप्रकाश खंदारे यांनी आपल्या भाषणात समाजावर होत असलेले अन्याय दूर करण्यासाठी सर्वांनी एकत्र येण्याची गरज असून त्यासाठी संघटित लढा उभा करण्याचे आवाहन केले. यावेळी माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे यांनी देशाला स्वातंत्र्य मिळून सत्तर वर्षे होत आली तरी समाजाला न्याय मिळाला नाही. 

समाजातील काही मूठभर लोकांना याचा लाभ झाला असून समाजातील प्रत्येकापर्यंत घटकाचा विकास करण्यासाठी हे जुल्मी शासन सत्तेतून हद्दपार झाले पाहिजे. त्यासाठी समाजाने आता सत्ता संपादन करण्यासाठी एकत्रित येण्याचे आवाहन केले. आपल्या भाषणशैलीतून ग्रामीण भागात आजही मातंग समाजावर कशाप्रकारे अन्याय केला जातो याची अनेक उदाहरणे यावेळी उपस्थितांना दिली. 

यावेळी माजी आ. लक्ष्मणराव माने, माजी आ. विजयराव मोरे, सोहम लोंढे, सुरेश पाटोळे, आनंद चंदनशिवे यांची भाषणे झाली. साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या  पुतळ्याला पुष्पहार अर्पण करुन हा मोर्चा भेैय्या चौक, मेकॅनिक चौक, सरस्वती चौक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकमार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर आला. यावेळी या मोर्चाचे रुपांतर जाहीर सभेत झाले. यावेळी हजारो मातंग समाजबांधव या मोर्चात सहभागी झाले होते.