Sat, Jul 20, 2019 11:27होमपेज › Solapur › मंगळवेढ्याच्या दक्षिण भागात धंदेवाले जोमात तर पोलिस प्रशासन कोमात

मंगळवेढ्याच्या दक्षिण भागात धंदेवाले जोमात तर पोलिस प्रशासन कोमात

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

रड्डे : वार्ताहर

मंगळवेढा तालुक्यातील दक्षिण भागातील सर्रास गावांमध्ये अवैध धंदेवाले यांनी अक्षरशः कहर केला असून एका एका  गावांमध्ये  तब्बल सात ते आठ धंदे चालू असल्याने या भागात अवैध धंदेवाले यांनी आपली दारू आणि शिंदी यांची दुकाने बेकायदेशीरपणे जोमात थाटली आहेत.

या बेकायदेशीर धंदेवाल्यावर ना कोणाचा धाक आहे ना दरारा. पोलिस खात्याला हे अवैध धंदेवाले  जुमानतसुद्धा नाहीत  कोण पोलिस आमचे कोणीसुद्धा काही करू शकत नाही  असे म्हणण्यापर्यंत त्यांनी आता मजल मारली आहे. हे धंदे करणार्‍या लोकांना तालुक्यातील काही प्रतिष्ठीत लोकांना आपलेसे करून आपला धंदा जोमात थाटला आहे. या अवैध धंद्यामुळे तालुक्यातील तरुण पिढी व्यसनाच्या आहारी जाऊन आपले आयुष्य उद्ध्वस्त करीत आहे. तसेच व्यसनाधीनतेमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत असल्याचे दिसून येत आहे.

पोलिस प्रशासनाने वेळीच यांना लगाम नाही घातल्यास याचे दुष्परिणाम मोठ्या प्रमाणात जनतेस आणि पोलिस प्रशासन यांना सहन करावे लागणार आहेत. या बेकायदा दारू, शिंदी,  मटका, जुगार आणि वाळू वाहतूक या सर्व प्रकारच्या अवैध धंदे या भागात मोठ्या संख्येने सुरू आहेत. या भागातील पोलिस अधिकारी मात्र मूग गिळून गप्प बसले असून त्यांचा या भागात कसल्याच प्रकारचा धाक नसल्याने अवैध  धंदेवाल्यांनी आपले धंदे बेकायदेशीरपणे चालू ठेवले आहेत. अवैध धंदे जोमात असल्याने पोलिसांच्या कामगिरीवर प्रश्‍नचिन्ह  निर्माण झाले आहे. पोलिस प्रशासनाने यांना वेळीच धडा शिकवणे गरजेचे आहे. मंगळवेढा तालुक्यातील बर्‍याच गावातील ग्रामदेवतेच्या यात्रा मोठ्या प्रमाणात चालू झाल्या असून यासाठी येणार्‍या भाविक-भक्‍तांना आणि येथील लोकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. 

पोलिस प्रशासनाने कारवाई नाही केल्यास आंदोलन करण्यात येईल असा इशारा या भागातील तरुण वर्गांनी दिला आहे. या भागातील काही गावात दारू बंदीचा ठराव संमत होऊन सुद्धा या गावात खुलेआम अवैध धंदे चालू असल्याचे दिसून येत आहे. तसेच या भागातील शिरनांदगी,  चिक्‍कलगी, पौट, जित्ती या भागातील ओढयामधून अवैध वाळू वाहतूक रात्रभर जोमात चालू असते याकडे सुद्धा पोलिस प्रशासन डोळेझाक करत असल्याचे दिसून येत आहे. हे सर्व धंदे लवकरात लवकर बंद करण्यात आले पाहिजे अन्यथा जिल्हा पोलिस प्रमुख विरेश प्रभू यांच्याकडे तक्रार करून मोठ्या प्रमाणात आंदोलन करण्यात येईल अशा इशारा या भागातील तरुण  वर्गातून देण्यात आला आहे.

Tags : Solapur, Solapur News, Massive increase in addiction, illegal liquor shops, Illegal traffickers


  •