Tue, Apr 23, 2019 13:33होमपेज › Solapur › रात्री अकरा वाजेपर्यंत चालले कामकाज

लातूर महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत प्रचंड गोंधळ

Published On: Sep 07 2018 11:53PM | Last Updated: Sep 08 2018 1:34AM लातूर : प्रतिनिधी 

सत्ताधारी भाजप जातिवाद करीत असल्याच्या काँग्रेस नगरसेवकाच्या आरोपावरून शुक्रवारी मनपाच्या सर्वसाधारण सभेत प्रचंड गोंधळ उडाला. यामुळे महापौरांना अर्धा तास सभा तहकूब करावी लागली. रात्री अकरा वाजूनही सभा सुरूच होती.

 महापौर सुरेश पवार व आयुक्त कौस्तुभ दिवेगावकर यांच्या प्रमुख उपस्थितीत सभेस दुपारी तीन वाजता सुरुवात झाली. तब्बल तीन महिन्यानंतर सभा होत असल्याने सर्वांचे लक्ष तिच्याकडे लागले होते. विषय पत्रिकेवर विविध १५ विषय देण्यात आले होते.  पत्रिकेवरील विषयावर चर्चा होण्यापूर्वी काँग्रेसचे नगरसेवक विक्रांत गोजमगुंडे यांनी त्यांनी केलेल्या विविध मागण्याबद्दल महापौरांकडे विचारणा केली. लेबर कॉलनीतील स्त्री रुग्णालयाला माता रमाबाई आंबेडकर यांचे नाव द्यावे या आपल्या मागणीचे काय झाले ? ,  असा सवाल त्यांनी महापौरांना केला. तथापि समाधानकारक उत्तर न मिळाल्याने विक्रांत व काँग्रेसचे नगरसेवक संतप्त झाले. त्यांनी सत्ताधारी भाजप जातिवाद करीत असल्याचा व अल्पसंख्यांकांना  सापत्न वागणूक देत असल्याचा आरोप केला . यावर आक्षेप घेत भाजपाचे नगरसेवकही आक्रमक झाले. ते आमने-सामने आल्याने प्रचंड गोंधळ उडाला. यातच काँग्रेसच्या काही नगरसेवकांनी भाजपाच्या नगरसेविका कोमल  वायचळकर यांनी  नगरसेवक विक्रांत गोजमगुंडे यांच्या दिशेेनने पाण्याची बाटली भिरकवल्याचा  आरोप केला.  त्यामुळेही गोंधळ अधिक वाढला व महापौरांनी अर्ध्या तासासाठी सभा तहकूब केली. त्यानंतर सभा सुरू झाली तथापि गोंधळ फारसा शमला नाही. रात्री अकरा वाजले तरी चर्चा सुरूच होती. गोंधळातच विषयांना मंजुरी देण्यात आली