Sun, Mar 24, 2019 04:09होमपेज › Solapur › पंढरपूरकरांच्या मनात वीर पुत्राच्या चिरंतन स्मृती

पंढरपूरकरांच्या मनात वीर पुत्राच्या चिरंतन स्मृती

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

पंढरपूर : प्रतिनीधी

अध्यात्मिकनगरी,  दक्षिण काशी अशी ओळख असलेल्या पंढरीला पराक्रमाची, देशभक्‍तीची, शूरवीराची जन्मभूमी अशीही ओळख शौर्यचक्रवीर शहीद मेजर कुणाल गोसावी यांच्या बलीदानामुळे मिळाली आहे. गेल्या वर्षी 29 नोव्हेंबर रोजी कुणाल गोसावी यांच्या बलिदानाची बातमी धडकली आणि संपूर्ण पंढरीनगरी शोकसागरात बुडून गेली. बुधवार दि. 29 नोव्हेंबर रोजी या बलिदानाचा पहिला स्मृतिदिन साजरा होत असताना कुणालच्या चिरंतन स्मृतींनी पंढरपूरकरांना कायम देशाचा विचार करण्यास प्रवृत्त केले आहे. 

पंढरपूरचे सुपुत्र मेजर कुणाल गोसावी यांना 29 नोव्हेेंबर रोजी काश्मिरमधील नगरोटा येथे अतिरेक्यांशी लढताना वीर मरण आले. स्वातंत्र्य लढ्यात मोठे योगदान दिलेल्या पंढरपूर शहराने स्वतंत्र भारताच्या रक्षणाकरिता दिलेले हे पहिलेच बलिदान होते. त्यामुळे पंढरपूरकरांवर या बलिदानामुळे दु:खाचा डोंगर कोसळला त्याचबरोबर अभिमानाने छाती भरूनही आली. कुणालच्या बलिदानाने पंढरपूरकरांच्या मनात राष्ट्रप्रेमाचे स्फुल्लिंग चेतवले गेले. 

गेल्या वर्षभरात पंढरपूर शहर आणि तालुक्यातील जनमानस कुणालच्या बलिदानाने हेलावून गेल्याचे दिसून आले. लग्पपत्रिकेवर कुणालचे छायाचित्र छापण्यापासून ते सर्व समारंभ, उत्सव, विविध संस्थां, संघटनांचे कार्यक्रम यातूनही कुणालच्या बलिदानाचा गौरवपूर्ण उल्लेख केला गेला. कुणालच्या कुटुंबीयांवरही पंढरपूरकरांच्या मायेची, प्रेमाची बरसातच गेल्या वर्षभरात झाली. शहीद कुणाल हे कुणी परेक नाही तर आपल्याच घरातील, कुटुंबातील कुणी तरी होतं या आपुलकीनं पंढरपूरकरांनी कुणालच्या आठवणी, त्यांच्या त्यागाच्या, बलिदानाच्या स्मृतींना वर्षभर उजाळा दिला. 

कुणालच्या बलिदानापासून युवकांनाही प्रेरणा मिळाल्याचे वर्षभर दिसून आले. दरम्यानच्या काळात शहीद कुणाल यांना लष्करी सेवेतील  शौर्यचक्रचा  बहुमान मिळाला.त्याचाही पंढरपुरकरांना मोठा अभिमान वाटतो आहे.  आज  शहीद कुणालच्या  प्रथम स्मृतिदिनी त्यांच्या आठवणींनी संपूर्ण पंढरपूरकर पुन्हा एकदा देश प्रेमाने भारावले आहे. वाखरी येथील त्यांच्या मुळगावी कुणालच्या बलिदानास साजेसे शहीद स्मारक कुणालच्या कुडुंबीयांनी उभा केले आहे. 

ज्याठिकाणी कुणालवर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्याठिकाणी उभा राहिलेले हे स्मारक भविष्यात अनेक युवकांना राष्ट्रप्रेमाची, राष्ट्रासाठी त्यागाची प्रेरणा देत राहील. आणि शहीद कुणालच्या स्मृती चिरंतन होतील.

दै.‘पुढारी’ने ही केला वीर कुटुंबीयांचा सन्मान

राष्ट्रकार्यात कायम अग्रेसर राहिलेल्या ‘दै. पुढारी’ने 1 जानेवारी 2017 रोजी 78 वर्धापनदिनी शहीद कुणालच्या बलिदानाचा सन्मान करण्यासाठी ज्येष्ठ नेते माजी आ. सुधाकरपंत परिचारक यांच्याहस्ते सत्कार केला. यावेळी शहीद स्मारकाची देखणी प्रतिकृती देऊन शहीद कुणाल गोसावींच्या वीरपत्नी उमादेवी, वीरमाता सौ. वृंदाताई गोसावी आणि वीरपीता मुन्नागीर गोसावी, वीरकन्या कु. उमंग यांचा संयुक्‍त सन्मान केला होता.