होमपेज › Solapur › ‘माझे तुझ्यावर प्रेम आहे’:पोलिसाने केला बलात्कार

‘माझे तुझ्यावर प्रेम आहे’:पोलिसाने केला बलात्कार

Published On: Dec 16 2017 1:50AM | Last Updated: Dec 16 2017 11:57AM

बुकमार्क करा





सोलापूर : प्रतिनिधी

विवाहितेचे विवस्त्रावस्थेतील व्हिडीओ चित्रीकरण करून तिच्यावर वारंवार बलात्कार करून तिला रस्त्यात मारहाण करणार्‍या पोलिसाला विजापूर नाका पोलिसांनी अटक केली आहे. पोलिस शिपाई भीमराव ऊर्फ स्वप्नील अरविंद इंगळे (ब. नं. 1383, वय 29, रा. घर नं. 178, रामलिंग सोसायटी, विजापूर रोड) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. याबाबत पीडित  महिलेने फिर्याद दाखल केली आहे. अटक करण्यात आलेल्या पोलिस शिपायास विशेष न्यायाधीश कुलकर्णी यांच्यासमोर हजर करण्यात आले असता, त्याला 5 दिवस पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. पीडित महिला ही नोकरीस आहे. त्या महिलेची आणि पोलिसशिपाई स्वप्निल इंगळे याची ओळख होती. या ओळखीचा फायदा घेत इंगळे हा 10 जुलै 2015 रोजी दुपारी  कोणी नसल्याचे पाहून तिच्या घरात घुसला.
 
इंगळे याने तिला माझे तुझ्यावर प्रेम आहे, असे म्हणून तिच्याशी जबरदस्तीने  शरीरसंबंध ठेवले. त्यावेळी इंगळेने या महिलेचे विवस्त्रावस्थेतील व्हिडीओ चित्रीकरण करून ते दाखविले. त्यानंतर इंगळेने ही बाब तुझ्या पतीस सांगितली तर त्याला हे व्हिडीओ चित्रीकरण दाखवितो, अशी धमकी देऊन महिलेच्या असहायतेचा फायदा घेत इंगळे याने ऑगस्ट 2017 पर्यंत अनेकदा पीडित महिलेवर तिच्याच घरात जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले.

1 डिसेंबर 2017 रोजी दुपारी  ही महिला कामावर जात असताना इंगळेने मोदी परिसरात रस्त्यावर तिला अडवून तुझा मोबाईल कोठे आहे, तू कोणाबरोबर फिरतेस म्हणून त्या महिलेला रस्त्यात मारहाण व शिवीगाळ करून रेल्वे रुळावर नेऊन टाकण्याची धमकी दिली, तसेच तिच्या पतीविरुद्ध व तिच्याविरुद्ध अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करून तिची नोकरी घालविण्याची धमकी दिली. याबाबत या महिलेने सांगितल्यानंतर तिच्या पतीने 1 डिसेंबर व 13 डिसेंबर रोजी पोलिसशिपाई इंगळेला फोन करून विचारले असता त्यांनाही इंगळेने धमकी दिली म्हणून विजापूर नाका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, गुन्हा दाखल होताच पोलिसशिपाई इंगळे यास पोलिसांनी अटक केली. पोलिस निरीक्षक फुगे तपास करीत आहेत.