Fri, Apr 26, 2019 20:16होमपेज › Solapur › बाजार समिती निवडणूक; राखीव गणातील उमेदवारांचा जीव टांगणीला

बाजार समिती निवडणूक; राखीव गणातील उमेदवारांचा जीव टांगणीला

Published On: Jun 01 2018 10:23PM | Last Updated: Jun 01 2018 10:07PMसोलापूर : महेश पांढरे 

सध्या सुरु असलेल्या सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीला चांगला जोर चढला असला तरी या प्रक्रियेत राखीव गणातून निवडणूक लढणार्‍या उमेदवारांचा जीव मात्र टांगणीला लागला आहे. कारण येत्या दोन दिवसांत जातपडताळणी प्रमाणपत्र सादर करण्याचा सूचना निवडणूक अधिकार्‍यांकडून देण्यात आल्या आहेत. त्यामुळे उमेदवारांचे धाबे दणाणले असून याविषयी निवडणूक सहकार प्राधिकरणाकडे प्रशासनाच्यावतीने खुलासा मागविण्यात आला आहे. त्यामुळे सहकार प्राधिकरण यावर काय निर्णय घेणार्‍यांवरच राखीव मतदारसंघातील उमेदवारांचे भवितव्य ठरणार आहे. बाजार समिती निवडणुकीसाठी राखीव मतदारासंघातून निवडणूक लढविणार्‍या उमेदवारांकडून जात वैधता प्रमाणपत्रांची मागणी केली जात आहे. 

सध्या अर्ज दाखल करुन घेतले असले तरी अर्जाच्या छाननीपूर्वी जात वैधता प्रमाणपत्र द्या, अशा सक्त सूचना करण्यात आल्या आहेत. त्यामुळे उमेदवारांच्या पायाखालची वाळू घसरली आहे. सध्या तरी जात वैधता प्रमाणपत्र आवश्यक असल्याचेच निवडणूक प्राधिकरणाने जाहीर केले आहे. त्यामुळे येत्या दोन दिवसांत हे प्रमाणपत्र कसे मिळणार याची धास्ती उमेदवारांना लागून राहिली आहे. यामधून तोडगा काढावा तसेच ग्रामपंचायत निवडणुकीप्रमाणे पडताळणीसाठी अर्ज सादर केल्यानंतर मिळणारी पावती गृहीत धरुन उमेदवारी अर्ज ग्राह्य धरुन छाननीत पात्र करावा, अशी मागणी काही उमेदवारांनी निवडणूक अधिकारी ज्योती पाटील यांच्याकडे केली आहे.  त्यामुळे या जात वैधता प्रमाणपत्राविषयी नेमकी आता काय भूमिका घ्यायची याविषयी सहकार निवडणूक प्राधिकरणाकडेच खुलासा मागविण्यात आला आहे. त्यामुळे निवडणूक प्राधिकरण यावर काय निर्णय देणार, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.