होमपेज › Solapur › बाजार समिती संचालक अटकपूर्व जामीनप्रकरणी

दोन्ही बाजूंचा युक्‍तिवाद पूर्ण

Published On: Jun 12 2018 12:54AM | Last Updated: Jun 12 2018 12:05AMसोलापूर : प्रतिनिधी

सोलापूर कृषी उत्पन्‍न बाजार समितीमध्ये 1 एप्रिल 2011 ते 31 मार्च 2016 या कालावधीत विविध मार्गांनी 39 कोटी 6 लाख 39 हजार 193 रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी 11 जूनपर्यंत अंतरिम अटकपूर्व जामीन मिळालेल्या 17 संचालकांसह इतर संचालकांनी  दाखल केलेल्या अर्जांवर सोमवारी  दोन्ही  बाजूंचा युक्‍तिवाद पूर्ण झाला असून मंगळवारी अतिरिक्‍त सत्र न्यायाधीश यू. बी. हेजीब यांच्यासमोर  याबाबत निकाल होण्याची शक्यता आहेे.

विशेष लेखापरीक्षक सुरेश पंडितराव काकडे (वय 47, रा. कमर्शिअल कॉम्प्लेक्स, नवी पेठ, सोलापूर) यांच्या फिर्यादीवरून सभापती दिलीप माने यांच्यासह 32 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

त्यापैकी दिलीप माने, इंदुमती अलगोंड, राजेंद्र गुंड, प्रवीण देशपांडे, उत्तरेश्‍वर गुट्टे, सोजर पाटील, ऊर्मिला शिंदे, नागराज पाटील, शंकर येणगुरे, चंद्रकांत खुपसुंगे, रजाक निंबाळे, अशोक देवकते, इरप्पा म्हेत्रे, धोंडिराम गायकवाड, बाळासाहेब शेळके, कमलापुरे व दळवी यांना 11 जूनपर्यंत अंतिरिम अटकपूर्व जामीन मिळालेला आहे. या गुन्ह्यातील इतर 8 संचालकांनी अटकपूर्व जामीन मिळण्यासाठी न्यायालयात अर्ज दाखल केला आहे. 

अंतरिम अटकपूर्व जामीन मिळालेल्या व अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केलेल्या संचालकांच्या जामीन अर्जांवर सोमवारी अतिरिक्‍त सत्र न्यायाधीश हेजीब यांच्यासमोर सुनावणी  झाली. यावेळी  दोन्ही बाजूंच्या वकिलांनी युक्‍तिवाद पूर्ण केला. त्यामुळे   मंगळवारी  संचालकांच्या अटकपूर्व जामीन अर्जांवर निकालाची शक्यता आहे.

वेगवेगळ्या 14  मुद्द्यांवर बाजार समितीचा विश्‍वासघात करून  बाजार समितीच्या संचालक मंडळाने 1 एप्रिल 2011 ते 17 ऑक्टोबर 2016 या कालावधीत 39 कोटी 6 लाख 39 हजार 193 रुपयांचे नुकसान केले म्हणून जेलरोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडून सुरू आहे. याप्रकरणी सरकारच्या वतीने अ‍ॅड. प्रदीपसिंग रजपूत यांनी, तर संचालकांच्या वतीने अ‍ॅड. धनंजय माने, अ‍ॅड. भारत कट्टे, अ‍ॅड. मिलिंद थोबडे, अ‍ॅड. शशी कुलकर्णी, अ‍ॅड. जयदीप माने, अ‍ॅड. प्रशांत नवगिरे, अ‍ॅड. गुरुदत्त बोरगावकर काम पाहात आहेत.