Fri, May 29, 2020 04:11होमपेज › Solapur › निमित्त बाजार समितीचे, नांदी विधानसभेची!

निमित्त बाजार समितीचे, नांदी विधानसभेची!

Published On: Jun 28 2018 11:56PM | Last Updated: Jun 28 2018 9:01PMसोलापूर : महेश पांढरे 

सध्या सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीच्या प्रचाराचा जोर चांगलाच वाढला आहे. मागच्या विधानसभा निवडणुकीचे प्रतिस्पर्धी असणारे माजी आ. दिलीप माने आणि सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्यातच खर्‍याअर्थाने हा सामना मानला जात आहे. त्यामुळे निमित्त बाजार समितीचे आणि नांदी विधानसभेची, असे चित्र सध्या बाजार समितीच्या निवडणुकीतून दिसून येत आहे.

माजी आ. दिलीप माने यांच्यासह काही संचालकांवर कारवाईची टांगती तलावर होती. त्यामुळे बाजार समितीच्या निवडणूक प्रचारापासून माजी आ. दिलीप माने हे सक्रिय नव्हते. त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये निरुत्साह दिसून येत होता. दरम्यान, याकाळात सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी प्रचारात मोठी आघाडी घेतली होती. सहकारमंत्र्यांनी दक्षिण आणि उत्तरची खिंड पूर्ण ताकदीने लढविण्याची तयारी ठेवली आहे. त्यामुळे प्रत्येक मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न देशमुख यांनी चालविला आहे. मात्र बुधवारी माजी आ. दिलीप माने यांच्यासह काही संचालकांना अंतरिम जामीन मंजूर झाल्यानंतर माने हे बाजार समितीच्या निवडणूक प्रचारात पूर्ण ताकदीने उतरले असून त्यामुळे त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह वाढला आहे. यंदाची निवडणूक सोपी नाही. याचा कानोसा माजी आ. दिलीप माने यांनी सुरुवातीपासूनच घेतला होता. त्यामुळे सर्वपक्षीय नेत्यांची मोट बांधून त्यांनी या निवडणुकीला सामोरे जाण्याचा प्रयत्न केला आहे. 

यामध्ये त्यांना राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष बळीराम काका साठे, शिवससेनेचे नेते प्रकाश वानकर यांची मोठी ताकद मिळाली असून त्यांना पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांचेही पडद्यामागून सहकार्य मिळत असल्याची चर्चा आहे. त्यामुळे यंदाची बाजार समितीची निवडणूक ही सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्याविरुद्ध सर्वपक्षीय नेतेमंडळी, अशी झाल्याचे दिसून येत आहे. मात्र या निवडणुकीच्या विजय-पराजयानंतर सहकारमंत्री आणि माजी आ. माने यांना पुन्हा विधानसभा निवडणुकीसाठी आमने-सामने यावे लागणार आहे. त्यामुळे सध्याची निवडणूक या दोन्ही नेत्यांच्यादृष्टीने नाममात्र असली तरी यातून मिळणारे यश-अपयश हे येणार्‍या विधानसभा निवडणुकीची नांदी ठरविणारे असणार आहे. बाजार समितीच्या माध्यमातूनच त्यांनी पुढील विधानसभा निवडणुकीची तयारी चालविल्याचे अंतर्गत गोटातून दिसून येत आहे. माजी आ. माने यांचा जामीन मंजूर झाल्यानंतर ते आता सक्रिय प्रचारात उतरले आहेत. त्यामुळे सहकारमंत्री देशमुख आणि माजी आ. दिलीप माने यांच्यात आता चांगलीच जुगलबंदी रंगणार आहे.