होमपेज › Solapur › मराठा, धनगर समाज आंदोलकांचा बहिष्कार

मराठा, धनगर समाज आंदोलकांचा बहिष्कार

Published On: Jul 21 2018 1:34AM | Last Updated: Jul 20 2018 11:14PMपंढरपूर : प्रतिनिधी

 मराठा, धनगर आरक्षणावरून निर्माण झालेला पेच सोडवण्यासाठी  मराठा आणि धनगर समाज संघटनांच्या पदाधिकार्‍यांसोबत बैठक करण्यासाठी पालकमंत्री विजयकुमार देशमुख पंढरीत आले; मात्र त्यांच्या बैठकीवर बहिष्कार टाकल्यामुळे तब्बल 3 तासांत एकही पदाधिकारी, कार्यकर्ता बैठकीकडे फिरकला नाही. अखेर वाट पाहून  निराश भावनेने पालकमंत्री  परत गेले. 

आरक्षणाची  घोषणा  केल्याशिवाय आषाढी यात्रेच्या शासकीय महापूजेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येऊ नये, त्यांना महापूजा करू देणार नाही असा इशारा मराठा क्रांती मोर्चा आणि राज्य धनगर आरक्षण कृती समितीने दिला आहे.तसेच  यासंदर्भात राज्य सरकारनेच घोषणा करावी त्यांच्याशी चर्चा करायची नाही असा निर्णय दोन्ही समाजाच्या पदाधिकार्‍यांनी घेतला आहे.  यामुळे 4 दिवसांपासून पंढरीत तणाव निर्माण झाला  असून पोलिस प्रशासनही मुख्यमंत्र्यांचा दौरा सुखरूप पार पाडण्यासाठी प्रयत्नाला लागले आहे. दरम्यान  पंढरपुरात दोन दिवसांत 3  बस गाड्यांची तोडफोडही करण्यात आली आहे. या पार्श्‍वभूमीवर मुख्यमंत्र्यांच्या सूचनेवरून  नागपूरचे अधिवेशन सोडून आंदोलकांशी चर्चा करण्यासाठी पालकमंत्री विजयकुमार देशमुख शुक्रवारी सकाळी 11 वाजता पंढरपुरात दाखल झाले. त्यांच्या सोबत जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले, जिल्हा पोलिस अधीक्षक विरेश प्रभू, सहायक पोलिस अधीक्षक निखील पिंगळे उपस्थित होते. विविध माध्यमातून फोन करून मराठा आणि धनगर आरक्षण आंदोलकांना बैठकीचे आमंत्रण दिले गेले.  दुपारी 2 वाजेपर्यंत एकही पदाधिकारी, कार्यकर्ता बैठकीकडे फिरकला नाही. त्यामुळे पालकमंत्री देशमुख शासकीय विश्रामगृहात  प्रतीक्षा करीत बसले  होते.  अखेरीस 3 तास वाट पाहून पालकमंत्री परत गेले.