Tue, Apr 23, 2019 09:35होमपेज › Solapur › पंढरपुरात सोमवारी मराठा समाजाचे ‘जेलभरो’

पंढरपुरात सोमवारी मराठा समाजाचे ‘जेलभरो’

Published On: Sep 07 2018 1:06AM | Last Updated: Sep 06 2018 9:20PMपंढरपूर : प्रतिनिधी

मराठा आरक्षण आंदोलनादरम्यान झालेल्या एसटी बसेसच्या तोडफोडप्रकरणी दोषी धरून पोलिसांकडून सुरू असलेल्या चुकीच्या कारवाईच्या निषेधार्थ पंढरपूर शहर आणि तालुक्यातील मराठा समाजाने जेलभरो आंदोलनाचा इशारा दिला आहे. येत्या सोमवार,  10 सप्टेंबर रोजी येथील तहसील कार्यालयासमोर हे आंदोलन होणार असून आंदोलक स्वत:ला अटक करवून घेणार आहेत आणि जामीनही नाकारणार आहेत. यासंदर्भात जिल्हा पोलिस अधीक्षक, प्रांताधिकारी, तहसीलदार यांना समाजाच्यावतीने लेखी निवेदन दिले गेले आहे. 

जुलै-ऑगस्ट महिन्यात पंढरपूर तालुक्यात मराठा आणि धनगर समाजाचे आरक्षण आंदोलन उभे राहिले होते. यादरम्यान तालुक्याच्या अनेक भागांत एसटी बसेसवर दगडफेक करण्यात आली असून या प्रकरणात आंदोलन संपल्यानंतर आता पंढरपूर तालुका पोलिसांकडून मराठा समाजातील कार्यकर्त्यांची धरपकड सुरू झालेली आहे. कार्यकर्त्यांचे मोबाईल लोकेशन आणि इतर तकलादू कारणांचा आधार घेऊन रात्री-अपरात्री घरातून युवकांना उचलून आणले जात आहे. या कारवाईमुळे मराठा समाजातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वास्तविक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाळपोळीच्या घटना वगळता इतर प्रकारचे गुन्हे मागे घेतले जातील, अशी घोषणा केलेली असताना पोलिसांकडून संशयास्पद कारवाई सुरू केली आहे. त्यामुळे मराठा समाजातील नागरिकांनी पोलिसांच्या या कारवाईच्या निषेधार्थ येत्या 10 सप्टेंबर रोजी येथील तहसीलसमोर उपस्थित राहून स्वत:ला अटक करवून घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासंदर्भात समाजाच्या बैठकीत जेलभरो आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. त्यासंदर्भात पोलिस प्रशासनाला दिलेल्या निवेदनात या कारवाईचा निषेध करून आम्हालाही अटक करून जेलमध्ये टाका, अशी मागणी करण्यात आली आहे. 

पंढरपूर तालुक्यातील शेकडो कार्यकर्ते या आंदोलनात सहभागी होऊन अटक करवून घेणार आहेत. या आंदोलनात अटक केल्यानंतर जामीन घ्यायचा नाही, हमीपत्र लिहून द्यायचे नाही. पोलिसांकडून सुरू असलेली सुडबुद्धीची कारवाई मागे घेतली जाईपर्यंत जेलमध्येच बसायचे, असा निर्धार करून हे आंदोलन हाती घेतले असल्याची प्रतिक्रिया मराठा क्रांती मोर्चाचे प्रवक्ते मोहन अनपट यांनी व्यक्त केली आहे. याअनुषंगाने  मराठा क्रांती मोर्चाचे कार्यकर्ते आंदोलनाच्या तयारीला लागले आहेत.