Sun, Nov 18, 2018 09:35होमपेज › Solapur › सोलापूर : काकासाहेब शिंदेंना श्रद्धांजली वाहून आंदोलन

सोलापूर : काकासाहेब शिंदेंना श्रद्धांजली वाहून आंदोलन

Published On: Jul 24 2018 4:06PM | Last Updated: Jul 24 2018 4:06PMवैराग  : प्रतिनिधी 

सकल मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावे या मागणीसाठी सुरू असलेल्या आंदोलनात काल काकासाहेब शिंदेचा मृत्यू झाला. त्यांना वैरागमध्ये  श्रद्धांजली अर्पण करून मुख्यमंत्र्यांचा निषेध करण्यात आला. तर वैरागची संपूर्ण बाजारपेठ उत्स्फूर्तपणे बंद ठेवण्यात आली होती .

गेल्या सात-आठ दिवसांपासून संपूर्ण महाराष्ट्रात मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून विविध ठिकाणी आंदोलने करण्यात येत आहेत. दरम्यान काल औरंगाबाद येथील काकासाहेब शिंदे या तरुणाने गोदावरी नदीमध्ये उडी घेऊन आत्महत्या केली. याचे पडसाद ग्रामीण भागात ही उमटू लागले असून या घटनेचा निषेध म्हणून वैरागमध्ये कडकडीत बंद पाळण्यात आला .

मराठा तरुणांनी येथील छत्रपती शिवाजी चौकात एकत्र येऊन काकासाहेब शिंदे यांना श्रद्धांजली वाहिली तर फडणवीस सरकारचा निषेध म्हणून मुख्यमंत्र्याच्या पुतळ्याचे दहन केले. आंदोलनाची तीव्रता पाहता एस .टी. प्रशासनाने गाड्या सकाळपासून बंद ठेवल्या होत्या. वैरागमधील सर्व शैक्षणिक संकुलातील शाळा खबरदारीचा उपाय म्हणून सोडून  देण्यात आल्या. अत्यावश्यक सेवा वगळता बँकांसाहित सर्व व्यवहार उत्स्फूर्त पणे बंद ठेवण्यात आले होते.

पंढरपूरची आषाढीवारी कालच झाली असल्याने वारीवरून परतणाऱ्या वारकऱ्यांची गैरसोय होऊ नये म्हणून आंदोलकांनी पोलिस प्रशासन व एस .टी .प्रशासन यांची भेट घेऊन एस .टी .बस सुरू केल्या. आंदोलनादरम्यान कोणत्याही सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान होणार नाही याची काळजी आंदोलकांनी घेतली होती. यावेळी पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.