Fri, Apr 26, 2019 17:51होमपेज › Solapur › मराठा मोर्चा : 52 बसेस फोडल्या; 1 जाळली 3 दिवसांत 22 लाखांचे नुकसान

मराठा मोर्चा : 52 बसेस फोडल्या; 1 जाळली 3 दिवसांत 22 लाखांचे नुकसान

Published On: Jul 22 2018 11:59PM | Last Updated: Jul 22 2018 11:58PMसोलापूर ः प्रतिनिधी

मराठा समाजाला आरक्षणाच्या  मागणीसाठी गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या आंदोलनाचा सर्वाधिक फटका लाल परीला बसला असून आक्रमक होऊन रस्त्यावर उतरलेल्या आंदोलकांनी एकट्या सोलापूर डिव्हिजनमधील 52 बसेस फोडल्यात, तर एक बस जाळली आहे. तीन दिवसांच्या आंदोलनात एसटी महामंडळाचे जवळपास 22 लाख 20 हजार रुपयांचे नुकसान झाले असल्याची माहिती सोलापूर आगाराच्या सूत्रांनी दिली.

रखडलेल्या मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा समाज आक्रमक झाला असून आषाढी एकादशीची शासकीय महापूजा करण्यास मुख्यमंत्र्यांना विरोध करण्यात आला आहे. गतवेळी शांततेच्या मार्गाने झालेल्या मराठा आंदोलनास यंदा मात्र हिंसक वळण लागले आहे. यापूर्वी मराठा समाजाने राज्यात शांततेत 58 मूक मोर्चे काढले होते. मूक मोर्च्यांनी मागणी मान्य होत नसल्याचे सांगत मराठा समाजाने 
ठोक मोर्चे काढण्याचा इशारा सरकारला दिला होता. दरम्यान, नुकतेच नोकर भरतीतील मराठा समाजाला 16 टक्के आरक्षण देण्यावरून वाद निर्माण झाला.  नोकर्‍यांतील आरक्षण राखून ठेवू आणि आरक्षणाचा निर्णय झाल्यानंतर अंमलबजावणी करू, असे आश्‍वासन मुख्यमंत्र्यांनी नागपूर अधिवेशनात चर्चेदरम्यान दिले होते. परंतु मराठा समाजाच्या मागण्यांकडे सरकार दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप करत मराठा समाजाने शासकीय नोकर भरतीच पुढे ढकलण्याची मागणी केली होती. मराठा आरक्षणासाठी आक्रमक झालेल्या समाजाच्या कार्यकर्त्यांनी यापुढे हल्ला बोल, गनिमी कामा व ठोक मोर्चा अशा आंदोलनाचा इशारा दिला होता.

ऐन आषाढीच्या पंढरपूर यात्रेदरम्यानच मराठा समाज आक्रमक झाला. राज्यात विविध ठिकाणी आंदोलने सुरू झाली. सोलापुरातील आंदोलनाला हिंसक वळण लागले. तीन दिवसांच्या आंदोलनात राज्य परिवहन मंडळाच्या बसेसवर आंदोलकांनी तुफान दगडफेक करत आपला रोष व्यक्‍त केला. आषाढी वारीनिमित्त सोलापूर डिव्हीजनमधून सोलापूर-पंढरपूर ज्यादा बसेसची सोय करण्यात आली आहे. तर राज्याच्या विविध भागातून दर्शनासाठी पंढरपूरला येणार्‍या एसटी बसेसची संख्यादेखील मोठी आहे. आंदोलनाला लागलेल्या हिंसक वळणामुळे राज्य परिवहन महामंडळाच्या उत्पन्नावर तर परिणाम झालाच पण अनेक बसेसचे नुकसानही झाले. शनिवारी सोलापूर-बार्शी महामार्गावर आंदोलकांनी बसला पेटवून दिल्यामुळे सोलापूर-बार्शी  महामार्गावर बसेस सोडल्या नाहीत.सोलापूर ते पंढरपूर तिर्‍हे-मंगळवेढा मार्गे जाणार्‍या बसेस पूर्णपणे बंद  होत्या. उस्मानाबाद आगारातून बार्शीकडे जाणार्‍या बसेसदेखील रद्द करण्यात आल्या.

सोलापूर डिव्हीजनमधील बार्शी, पंढरपूर, वैराग, मोहोळ, मंगळवेढा, दक्षिण सोलापूर, सोलापूर बसस्थानक भागांत 52 बसेस फोडल्या आहेत. या दगडफेकीत एकही प्रवाशी जखमी  नाही, तर एसटी बसचे चालक व वाहक  देखील सुखरुप आहेत. परंतु ऐन आषाढी वारीत गरिबांच्या लालपरीला मोठा दणका बसला असून पंढरपूरला दर्शनासाठी जाणार्‍या भाविकांची देखील गैरसोय झाली आहे. एसटी बस बंद असल्याने खासगी बसवाल्यांकडून प्रवाशांची लूट सुरू आहे.