Wed, Nov 21, 2018 21:27



होमपेज › Solapur › आता मूक नव्हे, ठोक मोर्चे!

आता मूक नव्हे, ठोक मोर्चे!

Published On: Jun 27 2018 1:22AM | Last Updated: Jun 26 2018 11:22PM



तुळजापूर : प्रतिनिधी

लाखोंच्या संख्येने 58 मराठा क्रांती (मूक) मोर्चे अत्यंत शांततेत, शिस्तीत, संयमाने काढून सर्व जगापुढे शांततापूर्ण आंदोलनाचा वस्तुपाठ मराठा समाजाने घालून दिला. मात्र, शासनाने समाजाच्या न्याय्य मागण्यांची कसलीही दखल घेतली नाही. केवळ उपसमितीचा फार्स करून विविध फसव्या घोषणा करून समाजाची दिशाभूल केली, अशी माहिती मराठा क्रांती मोर्चाचे राज्य समन्वयक आबासाहेब पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.

मराठा आरक्षण, शेतकरी आत्महत्या, कर्जमाफी, शेतमालाला हमीभाव, विद्यार्थ्यांचे प्रश्‍न प्रलंबित आहेत. ते सोडवण्याची सरकारकडे इच्छाशक्‍ती नाही. त्यामुळे आरक्षणासह इतर न्याय्य हक्‍क आणि मागण्यांसाठी 29 जून रोजी सकाळी 11.30 वाजता तुळजापूर येथे तुळजाभवानी मंदिर महाद्वारासमोर आई तुळजाभवानीचा जागरण गोंधळ घालून आंदोलनाच्या दुसर्‍या पर्वाला सुरुवात करण्यात येणार आहे, असे आबासाहेब पाटील म्हणाले.

निद्रिस्त राज्य सरकारला जाग आणण्यासाठी या जागरण गोंधळ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून, पूर्वतयारीसाठी तुळजापूर शहर, तालुका आणि जिल्ह्यातील कार्यकर्ते परिश्रम घेत आहेत. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी पार्किंग व्यवस्था, प्रथमोपचार, ध्वनी व्यवस्था, स्वच्छता व्यवस्था, पाणीपुरवठा व्यवस्था यासह विविध सात समित्यांचे गठन केले आहे, असेदेखील आबासाहेब पाटील यांनी सांगून, जागरण गोंधळाच्या कार्यक्रमानंतर प्रतिनिधिक स्वरुपात 3 ते 4 वक्त्यांचे मार्गदर्शन होणार आहे. 

सरकारबरोबर यापुढे कसलीही चर्चा केली जाणार नाही किंवा निवेदने दिली जाणार नाहीत. शासनाने स्वतः होऊन आपले म्हणणे सादर करावे, असेदेखील त्यांनी ठणकावले. तसेच कोपर्डी अत्याचार प्रकरणात जिल्हा न्यायालयाने आरोपींना फाशीची शिक्षा सुनावली आहे. मात्र आरोपींनी उच्च न्यायालयात अपील केले आहे. येथेही सरकार पक्षाने बाजू मांडण्यासाठी उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करावी, अशी मागणी करूनही आठ महिने उलटून गेल्यावरही अद्याप नियुक्ती केली नाही, अशी टीकाही पाटील यांनी केली. 

यापुढे गनिमी कावा पद्धतीने आंदोलने करून सरकारला जेरीस आणण्यात येईल. मूक मोर्चे नव्हे, तर ठोक मोर्चे काढून शासनाला सळो की पळो करून सोडण्यात येईल. आरपारच्या या लढ्यात यापुढील आंदोलने अधिक तीव्र केली जाणार असून, त्यामुळे कायदा, सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण झाल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी सरकारची राहील, असा इशारादेखील आबासाहेब पाटील यांनी दिला आहे. या पत्रकार परिषदेत सुनील नागणे यांनी 29 जून रोजी होणार्‍या कार्यक्रमाची माहिती देत सबंध जिल्हाभरातील स्वयंसेवकांचे गट विविध समितीच्या नियोजनासाठी कार्यरत राहणार असल्याचे सांगितले. याप्रसंगी महेश डोंगरे, कोपर्डी येथील पीडित मुलीचे वडील, यांच्यासह सुनील नागणे, जीवनराजे इंगळे, आबासाहेब कापसे, जगदीश पाटील, अर्जुन साळुंके, गजानन वडणे, किशोर पवार आदींसह तुळजापूर मराठा मोर्चा नियोजन समितीचे पदाधिकारी, कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.