Wed, Apr 24, 2019 11:33होमपेज › Solapur › सोमवारी सोलापूर बंद!

सोमवारी सोलापूर बंद!

Published On: Jul 26 2018 1:40AM | Last Updated: Jul 25 2018 10:15PMसोलापूर : प्रतिनिधी 

आषाढी एकादशीनिमित्ताने पंढरपुरात राज्याच्या कानाकोपर्‍यांतून दहा लाखांवर भाविक आलेले आहेत. ते घरी सुखरूप पोहोचल्यावर सोलापुरातील मराठा क्रांती मोर्चाची धार वाढणार असून 29 जुलैला जागरण-गोंधळ आणि त्याच्या दुसर्‍या दिवशी सोमवारी, 30 जुलैला सोलापूर जिल्हा बंद आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक दिलीप कोल्हे यांनी दिली.

सोलापुरातील शासकीय विश्रामगृहामध्ये बुधवारी क्रांती मोर्चाच्या सदस्यांची बैठक झाली. त्यावेळी सर्व सदस्यांनी एकमताने हा निर्णय घेतला. कोल्हे म्हणाले की, मराठा  मूकमोर्चा, चक्‍काजाम आदी आंदोलनांत सोलापूर शहर व जिल्ह्याने मोठ्या प्रमाणात सहभाग घेतलेला आहे; मात्र गेल्या दोन दिवसांपासून पंढरपूरला आषाढी यात्रेसाठी आलेले वारकरी परतीच्या वाटेवर असल्याने सोलापूर शहरासह विविध तालुक्यांतील एसटी बसस्थानकांवर वारकरी आहेत. त्यांना त्रास होऊ नये यासाठी मराठा आंदोलनाची धार वाढली नाही; मात्र वारकरी घरी पोहोचताच सोलापुरातील मराठा समाज पेटून उठेल आणि जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही तोपर्यंत हे आंदोलन शमणार नाही.

यावेळी दास शेळके म्हणाले की,  मराठा समाजाने मुंबई येथे काढलेल्या 58 व्या मूकमोर्चावेळी शासनाच्यावतीने देण्यात आलेल्या आश्‍वासनांची पूर्तता अद्याप झालेली नाही. म्हणून मराठा क्रांती मोर्चाच्यावतीने मराठा समाजाला आरक्षण द्यावे, मराठा विद्यार्थ्यांना शिक्षण शुल्कातील 50 टक्के सवलतीची अंमलबाजवणी न करणार्‍या महाविद्यालयांची मान्यता रद्द करावी, राज्य सरकारच्या नोकरभरतीत मराठ्यांसाठी घोषित केलेल्या 16 टक्के आरक्षणाचा अध्यादेश काढून त्याचे त्वरित कायद्यात रूपांतरण करावे, अण्णासाहेब पाटील महामंडळ योजनेंतर्गत कर्ज देण्यासाठी बँकांना सक्तीचे आदेश द्यावेत आणि कै. काकासाहेब शिंदे यांना त्वरित आर्थिक मदत देऊन हुतात्मा घोषित करावे आदी मागण्या त्यांनी यावेळी मांडल्या.

यावेळी दिलीप कोल्हे, प्रताप चव्हाण, श्रीकांत घाडगे, अमोल शिंदे, योगेश पवार, मिलिंद भोसले, राम जाधव, किरण पवार, शशी थोरात, शेखर फंड, नाना मस्के, दास शेळके, बाळासाहेब गायकवाड, सागर गायकवाड आदी  मराठाबांधव उपस्थित होते.