Thu, Jul 18, 2019 21:46होमपेज › Solapur › मराठा क्रांती मोर्चाचे 29 पासून दुसरे पर्व

मराठा क्रांती मोर्चाचे 29 पासून दुसरे पर्व

Published On: Jun 21 2018 1:18AM | Last Updated: Jun 21 2018 1:18AMतुळजापूर : प्रतिनिधी

वेळोवेळी सामंजस्याच्या भूमिका घेऊनही सरकार दखल घेत नाही. 57 प्रचंड मूकमोर्चे काढूनही शासन जाणूनबुजून दुर्लक्ष करत असल्याने सकल मराठा समाजामध्ये फसवले गेल्याची भावना वाढली आहे. शासनाच्या वेळकाढूपणाच्या धोरणामुळे समाजात प्रचंड अस्वस्थतेसह संताप पसरला आहे. या निद्रिस्त शासनाला जागे करून हादरा देण्यासाठी 29 जून रोजी तुळजापूर येथे सकल मराठा समाजाच्यावतीने देवीचा जागरण गोंधळ घालून लाखो समाजबांधवांच्या उपस्थितीत मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. यापुढे मूक मोर्चा नव्हे, तर ठोक मोर्चे निघतील, असा इशारा मराठा क्रांती मोर्चाचे राज्य समन्वयक आबासाहेब पाटील यांनी दिला.

आता सरकारशी कसलीही चर्चा केली जाणार नाही. तर सरकारने स्वतः समाजाकडे येऊन आश्‍वासनांची पूर्तता करावी. या मोर्चात सकल समाजबांधवांनी पारंपरिक शस्त्र तसेच औजारासह उत्स्फूर्त सहभाग घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले. 

ते मराठा समाजाचे आरक्षणासह इतर प्रलंबित प्रश्‍न आणि आंदोलनाची पुढील दिशा ठरवण्यासाठी तुळजापूर येथे बुधवार, 20 जून रोजी श्री तुळजाभवानी पुजारी मंडळ मंगल कार्यालयाच्या सभागृहात राज्यस्तरीय सुकाणू समितीच्या महत्त्वपूर्ण बैठकीत बोलत होते.  यावेळी रामभाऊ गायकवाड, संजय सावंत, जीवनराजे इंगळे, वसंतराव पाटील, सतीश खोपडे यांची समयोचित भाषणे झाली.

या बैठकीस विजय पवार, रमेश केरे-पाटील, महेश डोंगरे, ज्ञानेश्वर गायकवाड, संजय सावंत, विष्णू इंगळे, विजया भोसले यांच्यासह राज्यभरातील प्रमुख पदाधिकारी, विविध मराठा समाज संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, तसेच तुळजापूर येथील स्थानिक समाजधुरीण यांची प्रमुख उपस्थिती होती.

शुक्रवार, 29 जून रोजी तुळजापूर येथील शिवाजी चौकातून या मोर्चाला सुरुवात होणार असून तुळजाभवानी मंदिरासमोरील शहाजीराजे महाद्वारासमोर देवीचा जागरण गोंधळ घालून क्रांती मोर्चाच्या दुसर्‍या पर्वाला प्रारंभ होणार आहे. त्यानंतर तहसीलदार तुळजापूर यांना आपल्या विविध मागण्यांचे निवेदन देण्यात येणार आहे. या मोर्चात सकल मराठा बांधव आपल्या पारंपरिक शस्त्र आणि शेती औजारासह प्रचंड संख्येने सहभागी होणार असून दुसर्‍या पर्वासाठी राज्यभरातून सकल मराठा बांधवांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवावा, असे आवाहन यावेळी समन्वय समितीच्यावतीने करण्यात आले. 

या नियोजन बैठकीस उस्मानाबाद येथील मराठा समाज बांधवांसह तुळजापूर येथील वसंतराव पाटील, अशोक मगर, सतीश खोपडे, सज्जनराव साळुंके, किशोर पवार, नितीन पवार, जगदीश पाटील, अर्जुन साळुंके, रोहित पडवळ, आलोक शिंदे, महेश शिंदे, जगदीश पलंगे, जीवनराजे इंगळे, कुमारतात्या टोले, महेश चोपदार यांच्यासह तालुक्यातील दोनशेच्यावर पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.