Sun, Jul 21, 2019 08:15होमपेज › Solapur › निटूर येथे एटीएममधील बिघाडाचा अनेकांनी उठवला फायदा

निटूर येथे एटीएममधील बिघाडाचा अनेकांनी उठवला फायदा

Published On: Mar 09 2018 10:36PM | Last Updated: Mar 09 2018 9:19PMलातूर : प्रतिनिधी

एटीएममध्ये 100 रुपयांच्या रकमेवर 500 रुपये निघत असल्याची घटना निलंगा तालुक्यातील निटूर येथील एका एटीएममध्ये मंगळवारी रात्री घडली. ही वार्ता गावात वार्‍यासारखी पसल्याने अनेकांनी लाभ उठविण्यासाठी गर्दी केली होती. एटीएममधील तांत्रिक बिघाडामुळे हा प्रकार घडल्याचे सांगण्यात आले.

निटूर या गावात दोन एटीएम आहेत. मुख्य रस्त्यावर असलेल्या हिताची कंपनीच्या एटीएममध्ये मंगळवारी रात्री एक व्यक्ती पैसे काढण्यासाठी गेली होती. त्यास शंभर रुपये काढावयाचे होते व त्याने तशी माहिती फिड केली होती. पैसे काढण्याचे बटन दाबताच 100 रुपयांऐवजी 500 रुपये आले व तो गोंधळून गेला. विशेष म्हणजे त्याला 500 रुपये मिळाले असले तरी त्याच्या अकाऊंटमधून 100 रुपये कपात झाल्याचा संदेश त्याला आल्याने पुन्हा पैसे काढण्याचा मोह तो रोकू शकला नाही. ही बाब त्याने त्याच्या मित्राला कळवली व ती सार्‍या गावात पसरल्याने त्या एटीएममधून पैसे काढण्यासाठी लोकांनी एकच गर्दी केली. 500 रुपयाला तीन हजार रुपये, तर एक हजाराचा आकडा टाकला की पाच हजार पडू लागले.

त्यामुळे अनेकांनी आपले हात धुवून घेतले. सुमारे तीन लाखांची रक्कम काढण्यात आल्याची चर्चा होती. दरम्यान, ही बाब पोलिसांना कळताच पोलिस प्रदीप अल्लापूरकर घटनास्थळी फौज फाट्यासह दाखल झाले व त्यांनी गर्दी हटवून एटीएमचे शटर लॉक केले. काही वेळांनी एटीएमशी संबंधीत अधिकारीही आले. त्यांनीही पाहणी केली. एटीएमवर बंदोबस्त लावण्यात आला होता. दरम्यान, कोण कधी व किती पैसे काढले हे कळू शकते व  त्यावरुन उचलेली अतिरिक्त रक्कम संबंधीतांकडून वसूल करता येते. तथापि संबंधीत अधिकार्‍यांकडून बुधवारी कसलीच तक्रार आली नव्हती. तक्रार आल्यानंतर पोलिस तपास करणार आहेत.