Wed, May 22, 2019 07:07होमपेज › Solapur › मंद्रुपला शेतकरी सुविधा केंद्र स्थापन करणार 

मंद्रुपला शेतकरी सुविधा केंद्र स्थापन करणार 

Published On: Apr 24 2018 1:07AM | Last Updated: Apr 23 2018 10:34PMसोलापूर : प्रतिनिधी

शेतकर्‍यांचा शेतमाल निर्यातक्षम होण्यासाठी दक्षिण सोलापूर तालुक्यातील मंद्रुप येथे शेतकरी सुविधा केंद्र स्थापन करण्याचा निर्णय सोमवारी सहकारमंत्री सुभाष देशमुख व पालकमंत्री विजयकुमार देशमुख या दोघांनी एकत्रित घेतला. सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने होम मैदानावर आयोजित करण्यात आलेल्या आंबा महोत्सव उद्घाटनाच्या कार्यक्रमात हा निर्धार करण्यात आला. आंबा महोत्सवाच्या उद्घाटनाप्रसंगी प्रारंभी पुणे सहकार विभागाचे कार्यकारी संचालक सुनील पवार यांनी प्रास्ताविकात सोलापूर जिल्ह्यात शेतकर्‍यांसाठी सुविधा केंद्र सुरू करण्याचा प्रयत्न असून यासाठी जागा उपलब्ध करून देण्यात यावी, अशी अपेक्षा व्यक्त केली. हाच धागा पकडत सहकारमंत्री देशमुख यांनी आपल्या भाषणात पालकमंत्री व जिल्हाधिकारी यांना यासाठी मंद्रुप येथील लघुपाटबंधारे विभागाची चार एकर जागा देण्याची अपेक्षा केली. पालकमंत्री देशमुख यांनीही आपल्या भाषणात हाच धागा पकडून जिल्हाधिकार्‍यांना तातडीने जागेचा प्रस्ताव सादर करण्याची सूचना केली. 

यावेळी व्यासपीठावर भाजपचे जिल्हाध्यक्ष शहाजी पवार, अनिवाश महागावकर, महापौर शोभा बनशेट्टी, जिल्हा उपनिबंधक अविनाश देशमुख, बाजार समितीचे प्रशासक सुरेश काकडे, सचिव मोहनराव निंबाळकर आदी उपस्थित होते. यावेळी सहकारमंत्री देशमुख म्हणाले, यंदा हापूस आंब्याचे उत्पादन कमी झाले आहे. शेतकर्‍यांचाही फायदा व्हावा व ग्राहकांचाही फायदा व्हावा यासाठी दोघांनी सकारात्मक प्रतिसाद द्यावा. कोकणातून आलेल्या आंबा उत्पादकांनी विक्रीतून आलेला दहा टक्के नफा सोलापूर जिल्ह्यातील नामवंत वस्तू खरेदी करण्यासाठी करावा. सोलापूरच्या पर्यटनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले. 

पालकमंत्री देशमुख म्हणाले, जलयुक्त शिवारातील कामांमुळे यंदा अजूनही उजनी 40 ते 45 टक्के भरलेली दिसून येत आहे. सोलापूर जिल्ह्यात जलयुक्त शिवार अभियानात राज्यात एक नंबरचे काम झाले आहे. आंबा महोत्सवाचा उपक्रम अत्यंत चांगला असून या महोत्सवात स्थानिक शेतकर्‍यांच्या आंब्यालाही वाव देण्यात यावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. या महोत्सवात कोकणासह अन्य भागातील 30 आंबा उत्पादकांनी सहभाग घेतला आहे. यंदा आंब्याची आवक कमी असल्याने दरही जास्त दिसून येत आहे. तरीही उद्घाटनच्या सत्रातच ग्राहकांनी आंबा खरेदीसाठी मोठी गर्दी केल्याने आंबा महोत्सवातील आंबे दोन दिवसांतच संपण्याची शक्यता व्यक्त होत आहे. या उपक्रमासाठी बाजार समितीचे सहायक अधिकारी दत्तात्रय सूर्यवंशी, विनोद पाटील आदींसह कर्मचारी परिश्रम घेत आहेत. 

Tags : Solapur, Mandrupa, Farmer, Facility, Center, set, up