Mon, Jun 24, 2019 20:59होमपेज › Solapur › धनगर आरक्षणासाठी माळशिरस कडकडीत बंद

धनगर आरक्षणासाठी माळशिरस कडकडीत बंद

Published On: Aug 13 2018 11:40PM | Last Updated: Aug 13 2018 11:38PMमाळशिरस : तालुका प्रतिनिधी 

 धनगर समाजाला अनुसूचित जातीचे आरक्षण मिळावे या व इतर मागण्यांसाठी धनगर समाजाच्यावतीने पुकारण्यात आलेल्या माळशिरस बंदला शंभर टक्के प्रतिसाद मिळाला. अत्यावश्यक सेवा वगळता संपूर्ण शहर बंद होते. यावेळी सरकारचा निषेध करण्यासाठी काही तरुणांनी मुंडण केले.

धनगर समाजाला घटनेमध्ये अनुसूचित जातीचे आरक्षण आहे. फक्त ‘धनगर’ ऐवजी ‘धनगड’ अशा चुकीमुळे शब्द झाला आहे. वास्तविक ‘धनगड’ या जातीचा महाराष्ट्रात कुठेही समाज नाही. परंतु सरकार ही चूक दुरुस्त करीत नसल्याने आजपर्यंत धनगर समाजाला आरक्षण मिळाले नाही. त्यामुळे सरकार समाजाची फसवणूक करीत आहे.  त्यामुळे धनगर समाजाला घटनेत असलेले अनुसूचित जातीचे आरक्षण त्वरित द्यावे, सोलापूर विद्यापीठाला अहिल्यादेवी होळकर यांचे नाव द्यावे, आरक्षणासाठी झालेल्या आंदोलनासंर्दभात दाखल झालेले गुन्हे मागे घ्यावेत. यासाठी धनगर समाज आक्रमक झाला असून घटनात्मक असलेला अनुसूचित जमातीचा दर्जा द्यावा. यासाठी धनगर समाज गेली अनेक वर्ष लढा देत आहे. सरकार कोणतेही असो आश्‍वासनाशिवाय समाजाला काहीच मिळाले नाही. त्यामुळे धनगर समाजाच्यावतीने आज माळशिरस बंदचे आवाहन करण्यात आले होते. या आवाहनाला शहरात शंभर टक्के प्रतिसाद मिळाला. अत्यावशक्य सेवा वगळता संपूर्ण शहरात कडकडीत बंद पाळण्यात आला. सरकारचा निषेध करण्यासाठी समाजातील तरुणांनी मुंडण करीत सरकारचा निषेध केला. यावेळी माळशिरसचे उपनगराध्यक्ष आप्पासाहेब देशमुख, सुरेश टेळे, सचिन वावरे, अशोक वाघमोडे, संतोष वाघमोडे, अभिजित पाटील, आकाश सिद, महादेव काळेकर, स्वप्निल पाटील, बाळू बुरूंगले, भाऊ थोरात, योगेश देशमुख, संदीप सिद, संजय वाघमोडे आदींसह समाजबांधव उपस्थित होते.