Sat, Mar 23, 2019 12:32होमपेज › Solapur › माळशिरसच्या 10 जणांना मिळणार स्वातंत्र्य सैनिकांचा मान

माळशिरसच्या 10 जणांना मिळणार स्वातंत्र्य सैनिकांचा मान

Published On: Mar 14 2018 12:48AM | Last Updated: Mar 13 2018 9:23PMमाळशिरस : अनंत दोशी

देशात 25 जून 1976 तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी आणीबाणी लागू केली. या आणीबाणी विरुद्ध संघर्ष करीत कारावास भोगलेल्यांना स्वातंत्र्य सैनिकांचा दर्जा व पेन्शन देण्याची घोषणा फडणवीस सरकारने केली आहे. यामुळे माळशिरसमधील  आर.एस.एस.चे ज्येष्ठ नेते कै. विष्णुपंत कुलकर्णी यांच्या नेतृत्वाखाली 13  जणांनी या आणीबाणी विरोधात आंदोलन केल्याने त्यांना स्वातंत्र्य सैनिकाचा मान व पेन्शन मिळणार आहे. या तेरा जणांपैकी विष्णुपंत विठ्ठलराव कुलकणी, अ‍ॅड. कृष्ण मल्हार मिराजदार व विठ्ठल सखाराम शिंदे या तिघांचे निधन झाले असून बाकी 10 जण हयात आहेत.
 देशात आणीबाणी जाहीर झाली आणि देशात वर्तमानपत्रे, चळवळी, सभा, बैठका घेणे, यावर निर्बंध आले. देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी आणीबाणी जाहीर केली. देशभर हाहाकार माजला. समाजवादी  चळवळ तसेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या महाराष्ट्रातील अनेक नेत्यांचे अटक सत्र चालू झाले. माळशिरस मधील कै. अ‍ॅड. कृष्णा मल्हार मिराजदार यांना मिसा खाली अटक करून नाशिक येथील कारागृहात स्थानबद्ध करण्यात आले. त्यांना सहा महिन्यांची शिक्षा सुनावण्यात आली.

दि. 1 जानेवारी 1976 रोजी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येेष्ठ नेते कै. विष्णुपंत कुलकर्णी यांच्या नेतृत्वाखाली बाळासाहेब रामचंद्र राऊत, अनिल रुपचंद दोशी, विलास नामदेव पोरे, संभाजी दत्तात्रय आदट, दत्तात्रय प्रभाकर पंचवाघ, सुधीर भगवान पंचवाघ, संभाजी यशवंत यादव,  दत्तात्रय हनुमंत मस्के, बलभीम महादेव पिसे, विठ्ठल सखाराम शिंदे, ( सर्व राहणार माळशिरस ) प्रफुल्ल शंकर कुलकर्णी ( रा आंबेजोगाई, बीड ), सुरेश केशवराव पाटील ( रा नेत्रगाव, लातूर )  यांनी माळशिरस येथे आणीबाणी विरोधात सत्याग्रह केला.  याकारणास्तव सरकारने त्यांना अटक केली व माळशिरस न्यायालयात त्यांना एक महिन्याची शिक्षा सुनावण्यात आली. आता या सर्व सत्याग्रहींना स्वातंत्र्य सैनिकाचा दर्जा देण्याचे सरकारने जाहीर केले असून त्यांना पेन्शनही जाहीर झाली आहे. सरकारने या सत्याग्रहींना स्वातंत्र्य सैनिकांचा दर्जा देऊन पेन्शन चालू केल्याने माळशिरसमध्ये या घोषणेचे स्वागत करण्यात आले.