Thu, Jul 18, 2019 04:10होमपेज › Solapur › ‘या’साठी नगरसेवक करणार का आंदोलन?

‘या’साठी नगरसेवक करणार का आंदोलन?

Published On: Jul 19 2018 1:40AM | Last Updated: Jul 18 2018 8:56PM- प्रशांत माने

डबघाईला आलेल्या महापालिकेचे मोठे आर्थिक नुकसान होत असतानाही पालिकेच्या मेजर व मिनी गाळ्यांच्या प्रकरणात व्यापार्‍यांची बाजू घेत मोठ्या तड्यातापडीने थेट मुख्यमंत्र्यांना साकडे घालून पालिकेला तोट्यात घालणार्‍या प्रश्‍नावर महापौर, नगरसेवक यांनी स्टे मिळवल्याचे संपूर्ण सोलापूरकरांनी उघड्या डोळ्यांनी पाहिले.  

व्यापार्‍यांसाठी धावत सुटणारे महापौर, नगरसेवक आता यूजर चार्जेस माफ, 50 टक्के पाणीपट्टी कपातीसह प्रशासनाच्या मिळकतकरावर दोन टक्के दंड आकारणी प्रस्तावावर पालिकेकडून वेळेवर एकही सुविधा मिळत नसतानाही प्रामाणिकपणे कर भरणार्‍या नागरिकांच्या हितासाठी आंदोलन करणार का?, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

गेल्या 50 वर्षांची काँग्रेसची महापालिकेतील सत्ता उलटवून सत्तेवर आलेल्या महापौर व पदाधिकार्‍यांना त्यांच्या निवडणुकीतील आश्‍वासनांचा विसर पडला आहे. यूज नाही तेथील युजर चार्जेस माफ करणे, पाणीपट्टीत 50 टक्के कपात करणे, दैनंदिन पाणीपुरवठा आदी अनेक आश्‍वासने प्रचारात देण्यात आली होती. परंतु पालिकेतील सत्ताधारी नगरसेवकांमधील अंतर्गत वाद इतका विकोपास गेलेला आहे की, शहराचा विकास तर सोडाच, पण महापौरांवर सातत्याने सर्वसाधारण सभा तहकूब करण्याची नामुष्की ओढवत आहे. सत्ताधार्‍यांना सुरळीत सत्ता चालवता येत नसतानाही विरोधक मात्र आपापली राजकीय पोळी भाजून घेण्याच्या नादात असल्याचे दिसून येत आहे. 

शहर विकासावरुन सत्ताधार्‍यांना धारेवर धरताना विरोधक दिसत नाहीत. मात्र पालिकेचे आर्थिक नुकसान करणार्‍या गाळ्यांच्या प्रश्‍नावर मात्र सत्ताधारी आणि विरोधक व्यापार्‍यांच्या बाजूने गळ्यात गळे घातल्याचे दिसून आले.नागरिकांना दिलेले आश्‍वासन आपण पाळू शकलो नसल्याचे आत्मपरिक्षण करुन सत्ताधार्‍यांनी विरोधकांना सोबत घेऊन मुख्यमंत्र्यांकडे धाव घेत युजर चार्जेस माफी, पाणीपट्टीत पन्नास टक्के कपात यासह मिळकतकर वेळेत न भरल्यास महिन्याला दोन टक्के दंड लावण्याच्या प्रशासनाच्या प्रस्तावावर आंदोलन करणार का?, विरोधक यासाठी महापौरांना  साकडे घालणार का? याची उत्तरे नगरसेवकांना निवडणुकीत द्यावी लागणार आहेत. 

नागरिकांना मिळणार्‍या असुविधा आणि शहराचा न होणारा विकास यासाठीदेखील सत्ताधारी व विरोधकांनी कधी तरी एकत्र येऊन आंदोलन केले तर नागरिकांना पटेल की हे नगरसेवक फक्‍त व्यापार्‍यांचेच नसून सामान्य जनतेचेदेखील आहेत अन्यथा ‘पहिले पाढे पंचावन्न’.