Tue, Mar 19, 2019 03:11होमपेज › Solapur › अक्‍कलकोट शहर शंभर टक्के बंद

अक्‍कलकोट शहर शंभर टक्के बंद

Published On: Jan 04 2018 1:04AM | Last Updated: Jan 03 2018 9:14PM

बुकमार्क करा
अक्कलकोट : प्रतिनिधी  

भीमा-कोरेगाव प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई करावी अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा देत अक्‍कलकोट शहर व तालुक्यामध्ये बंद पाळण्यात आला. शहरात शंभर टक्के कडकडीत बंद, तर दुधनी, वागदरी येथे बंदसह रास्ता रोको करण्यात आला. अक्कलकोट येथील सर्व पक्ष, संघटना, मागासवर्गीय संघर्ष समिती यांच्यावतीने निवेदन देण्यात आले. दोषींवर कारवाई होण्यासाठी व त्या घटनेचा निषेध म्हणून सर्व पक्ष, संघटना मागासवर्गीय संघर्ष समिती यांच्यावतीने बुधवारी अक्‍कलकोट बंदची हाक दिली होती. त्याला प्रतिसाद देत व्यापार्‍यांनी स्वयंस्फुर्तीने दुकाने बंद ठेऊन अक्‍कलकोट बंद शंभर टक्के यशस्वी केले.

शांततेच्या मार्गाने शहरातील प्रमुख मार्गावरून भीमसैनिकांनी मोर्चा काढला. निवेदन नायब तहसीलदार डी. एफ. गायकवाड यांनी स्वीकारले. पालकांनी मुलांना शाळेत न पाठविल्याने शाळा कॉलेजेस बंद होते. ए-वन चौक येथील हुतात्मा स्तंभापासून मोर्चाला सुरुवात करण्यात आली. हा मोर्चा शहरातील फत्तेसिंह चौक, मेनरोड, सावरकर चौक, कारंजा चौक मार्गावरून घोषणा देत हा मोर्चा एस.टी. स्टॅन्डसमोर विसर्जित झाला. अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने बंद ठेवण्यात आली.

मराठा सेवा संघ, दलित स्वयंसेवक संघ आदींसह विविध संघटना यांनी या आंदोलनाला पाठिंबा दिला. कुठेही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. पोलिस निरीक्षक सूरज बंडगर यांचे पथक दिवसभर परिस्थितीवर लक्ष ठेऊन होते.
 

दुधनी येथे बंद व रास्ता रोको

मागासवर्गीय संघर्ष कृती समिती:- अक्‍कलकोट तालुका यांच्याकडून भीमा-कोरेगाव घटनेच्या निषेधार्थ दुधनीमध्ये आंदोलन करण्यात आले व काही काळ सोलापूर-गाणगापूर मार्ग रोखून धरण्यात आला. यावेळी अक्‍कलकोट दक्षिण पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक मधुकर पवार यांना निवेदन देण्यात आले व या घटनेतील आरोपींना त्वरित अटक करावे, अशी मागणी अक्‍कलकोट तालुका बसपा यांच्यावतीने करण्यात आली. या मोर्चावेळी अनेक भीमसैनिकांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली होती. त्यात महिलांची संख्या अधिक दिसून येत होती. मोर्चा दरम्यान कुठल्याही अनुचित प्रकार घडू नये, म्हणून पोलिस निरीक्षक मधुकर पवार, एजाज मुल्ला, अशोक पाटील, संजय जाधव, महादेव शिंदे यांनी चोख पोलिस बंदोबस्त ठेवला.

हंजगी येथे अमर भीम मंडळाच्यावतीने मोर्चा

अक्‍कलकोट तालुक्यातील हंजगी गावात अमर भीम तरुण मंडळाच्या वतीने निषेध मोर्चा काढून शौर्यदिनाच्या घोषणा देत शाळा, दुकाने बंद पाडले.निषेध मोर्चा जयभीमनगर येथून सुरू होऊन ग्रामपंचायत कार्यालय, गोंधळी वस्ती व समाज मंदिर या मार्गावरून काढण्यात आला. निषेध मोर्चाचे रुपांतर सभेत झाले. या सभेत दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी अमर भीम तरूण मंडळ कार्यकर्त्यांच्यावतीने करण्यात आली. यावेळी नितीन माने, अजय मस्के, अमोल मस्के, संदीप गायगवळी, पंकज मस्के, अनिल सोनकांबळे, लक्ष्मण मस्के, भीम कांबळे, कट्टेप्पा माने, कट्टेप्पा सोनकांबळे, राजेंद्र सोनकांबळे कार्यकर्ते उपस्थित होते.