Wed, Feb 26, 2020 10:23होमपेज › Solapur › सोलापूर जिल्ह्यात बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद, आज पंढरपूर बंद

सोलापूर जिल्ह्यात बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद, आज पंढरपूर बंद

Published On: Jan 03 2018 10:28PM | Last Updated: Jan 03 2018 10:28PM

बुकमार्क करा
सोलापूर शहरात बंददरम्यान मार्क्सवादी पक्षाच्या वतीने माजी आमदार नरसय्या आडम यांच्या नेतृत्वाखाली मोर्चाचे नियोजन करण्यात आले होते. मोर्चाला पोलिसांनी परवानगी नाकारली. परंतु, आडम हे मोर्चावर ठाम राहिल्याने पोलिसांनी बळाचा वापर करून त्यांच्यासह कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. त्यामुळे दत्तनगर परिसरात काही काळ तणाव निर्माण झाला होता. 

सोलापूर : प्रतिनिधी

भीमा कोरेगाव येथील घटनेच्या पार्श्‍वभूमीवर दलित संघटनांकडून पुकारण्यात आलेल्या बुधवारच्या महाराष्ट्र  बंदला  सोलापूर  शहर वगळता जिल्ह्यातील ग्रामीण भागात संमिश्र प्रतिसाद मिळाला. जिल्ह्यात बंददरम्यान किरकोळ अपवाद वगळता कोणताही अनुचित प्रकार घडला नाही, हे विशेष.

सोलापूर शहरात संमिश्र प्रतिसाद
 

भीमा कोरेगाव येथील घटनेच्या पार्श्‍वभूमीवर  बुधवारी महाराष्ट्र बंदची हाक दिली होती.  शहरातील शिवाजी चौक, एस.टी. स्टँड परिसर, बाळी वेस, नवी पेठ, पार्क चौक, कुंभार वेस, चाटी गल्ली, सराफ बाजार, सम्राट चौक, दत्त चौक आदी परिसरांमध्ये व्यापार्‍यांनी त्यांची दुकाने बंद ठेवली हेाती. पोलिस आयुक्‍त महादेव तांबडे यांनी स्वतः रस्त्यावर उतरून व्यापार्‍यांशी चर्चा करून दुकाने उघडण्याचे आवाहन केले. बंदच्या पार्श्‍वभूमीवर सोलापूर शहरात चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला असून, गैरप्रकार करणार्‍यांची अजिबात गय केली जाणार नाही. त्यामुळे व्यापार्‍यांनी त्यांचे व्यवहार सुरळीत सुरू करावेत, असे तांबडे यांनी सांगितले.
 

शहरी भागात चांगला प्रतिसाद

भीमा कोरेगाव येथील घटनेच्या पार्श्‍वभूमीवर जिल्ह्यातील पंढरपूर वगळता अन्य  तालुक्यांमध्ये पुकारण्यात आलेल्या बंदला शहरी भागात चांगला प्रतिसाद  मिळाला. मंगळवेढा, सांगोला, बार्शी, माळशिरस, अकलूज, माढा, कुर्डुवाडी, अक्‍कलकोट, मोहोळ या शहरी भागांमध्ये सकाळी आंबेडकरी अनुयायांच्या वतीने निषेध मोर्चा काढून आंदोलन करण्यात आले. ठिकठिकाणच्या गावांमध्येही निषेध व्यक्‍त करून गावबंद ठेवण्यात आली होती.
 

कडेकोट पोलिस बंदोबस्त
बंदच्या पार्श्‍वभूमीवर कायदा सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण होण्याच्या आशेने सोलापूर शहर तसेच ग्रामीण पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त तैनात केला होता. या बंदोबस्तामुळे कुठेही अनुचित प्रकार घडला नाही.
दरम्यान, जिल्ह्यातील महत्त्वाचे केंद्र असलेल्या पंढरपूर तालुक्यात  गुरुवारी बंद पुकारण्यात आला आहे. या बंदमध्ये सहभागी होण्याचे आवाहन आंबेडकरी संघटनांनीही केले असून संभाजी बिग्रेडने याला पाठिंबा दिला आहे. 
 

माळशिरस शहरात कडकडीत बंद
आमचा माळशिरस तालुका प्रतिनिधी कळवितो की, भीमा कोरेगांव येथे झालेल्या दंगल प्रकरणाचा निषेध करण्यासाठी माळशिरस शहरात आज कडकडीत बंद पाळण्यात आला. शहरातील सर्व व्यवहार बंद असल्याने शहरात शुकशुकाट जाणवत होता. माळशिरस बस स्थानकात ही तुरळक बस सेवा चालू होती. ग्रामीण भागात काल मुक्‍कामाला गेलेल्या बस तेवढया येत होत्या. शहरातून पंढरपूरहून पुण्याकडे जाणार्‍या व इतर लांब पल्ल्याच्या गाड्या दुपारनंतर सुरू झाल्या. परंतु, सर्व महाराष्ट्रात सर्वत्र बंदची हाक असल्यामुळे प्रवाशांनी प्रवास करणे टाळल्याने एस. टी. बसला प्रवासी संख्या कमी जाणवत होती. शहर व परिसरातील  सर्व शाळा व महाविद्यालये सुरळीत सुरू होती.
 

सर्व शासकीय व निमशासकीय कार्यालये सुरू होती मात्र नागरिकांची वर्दळ नसल्याचे दिसून आले. भीम सैनीकांनी या घटनेच्या निषेधार्थ मोटार सायकाल रॅली काढून निषेध व्यक्‍त केला. तसेच शासनाला निवेदन देऊन या घटनेची चौकशी करून दंगल खोरांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी निवेदनात करण्यात आली. शहर व परीसरांत शांतता व सुव्यवस्था राहावी यासाठी माळशिरस पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक शिवाजी शिंदे  हे शहरात फिरून परस्थीती वर लक्ष ठेऊन होते. तसेच शहर व परिसरातील चौक व महापुरुषांच्या पुतळ्यापाशी बंदोबस्त तैनात करण्यात आला होता बंद शांततेत पार पडला.